आपल्या घरासमोरील, कार्यालयाबाहेरील वा शाळा-महाविद्यालयासमोरील गल्ली स्वच्छ ठेवण्याचा वसा अनेकदा उचलला जातो. आपण आपल्या शाळेसमोरच्या रस्त्याला पर्यावरणाला घातक ठरणाऱ्या प्लॅस्टिकपासून मुक्त करण्याचा अनोखा वसा वांद्रे येथील एका शाळेने उचलला आहे.

वांद्रय़ाच्या कलानगर भागात ‘महात्मा गांधी विद्या मंदिर’ या शाळेने २१ आणि २२ डिसेंबरला हे अनोखे अभियान हाती घेण्याचे ठरविले आहे. आपल्या शाळेसमोरच्या गल्लीतच नव्हे, तर आजूबाजूच्या परिसरांतही कुठे प्लॅस्टिक पिशव्या किंवा तत्सम कचरा दिसणार नाही याची काळजी हे विद्यार्थी घेणार आहेत. याशिवाय आजूबाजूच्या परिसरात खाद्यपदार्थ, फळे-भाजी, वाणसामानाची विक्री करणाऱ्या विक्रेत्यांनाच नव्हे, तर रस्त्यावरून फिरणाऱ्यांनाही प्लॅस्टिकच्या वापराचे धोके समजावून देत विद्यार्थी जनजागृती करणार आहेत.

प्लॅस्टिकला कापडी पिशवी हा पर्याय असू शकतो, हे जाणाऱ्या-येणाऱ्या प्रत्येकाच्या मनावर ठसविले जाणार आहे. त्यासाठी शाळेनेच विद्यार्थ्यांना कापडी पिशव्या दिल्या आहेत. सुरुवातीला प्लॅस्टिकच्या वापरामुळे पर्यावरणाची कशी हानी होते, याची माहिती देणारी पत्रके विद्यार्थी वाटणार आहेत. त्यानंतर विद्यार्थी फेरीवाले, दुकानदार यांना भेटून त्यांनाही प्लॅस्टिक पिशव्यांचे दुष्परिणाम समजावून दिले जातील. तसेच, त्यांना आपल्या नेहमीच्या ग्राहकांना कापडी पिशवी वापरण्यास प्रोत्साहन कसे देता येईल, हे सांगितले जाईल. शाळेचे पाचवी ते नववीचे विद्यार्थी या अभियानात सहभागी होतील.

या उपक्रमाकरिता जवळच्या चेतना महाविद्यालयातील विद्यार्थ्यांचेही सहकार्य मिळविण्याच्या प्रयत्नात विद्यार्थी आहेत. या अभियानाकरिता विद्यार्थ्यांनी जवळच्या खेरवाडी पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचाऱ्यांचीही मदत घेतली आहे, तर स्थानिक नगरसेक अनिल त्रिंबककर हे या अभियानात सहभागी होऊन विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देणार आहेत.

‘‘या उपक्रमाच्या माध्यमातून पर्यावरण संवर्धनाबरोबरच समाजात मिसळून आपले म्हणणे समोरच्याला कसे पटवून द्यायचे याचा धडाही विद्यार्थ्यांना मिळणार आहे. त्यात त्यांचे संवादकौशल्य पणाला लागणार आहे. शिवाय विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शाळेचा स्थानिकांशी, व्यापाऱ्यांशी, पोलीस ठाण्यातील कर्मचाऱ्यांशी संपर्क वाढेल. शाळेविषयी, विद्यार्थ्यांविषयी, शिक्षकांविषयी स्थानिकांच्या मनात आपुलकी व सहकार्याची भावना निर्माण होईल,’’ असे शाळेचे संचालक मिलिंद चिंदरकर यांनी या प्रकारच्या उपक्रमांमागील हेतू स्पष्ट करताना सांगितले.