मुंबई : राज्यातील इतर भागांच्या तुलनेत पायाभूत सुविधा, इंटरनेटची उपलब्धता असूनही मुंबई शहरे, उपनगरांसह ठाणे जिल्ह्यातील विद्यार्थ्यांची शैक्षणिक स्थिती खालावल्याचे राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण (नॅशनल अचिव्हमेंट सव्‍‌र्हे) अहवालातून दिसते आहे. गणित, विज्ञानासह भाषा, सामाजिक शास्त्र विषयांतील विद्यार्थ्यांची सरासरी प्रगती ही ५० टक्क्यांपेक्षाही कमी असून दहावीतील ९० टक्क्यांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांना विज्ञान, सामाजिक शास्त्रातील प्राथमिक संकल्पनाही स्पष्ट झालेल्या नाहीत. 

राष्ट्रीय शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेने निश्चित केलेल्या अध्ययन निष्पत्ती निकषांनुसार विद्यार्थ्यांची शैक्षणिक पातळी जोखण्यासाठी सर्वेक्षण घेण्यात येते. गेल्या वर्षी (२०२१) ऑक्टोबरमध्ये देशभरात एकाच वेळी राष्ट्रीय संपादणूक सर्वेक्षण करण्यात आले. तिसरी, पाचवी, आठवी आणि दहावी अशा चार टप्प्यांवरील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीची पाहणी या वेळी करण्यात आली. तिसरी आणि पाचवीच्या वर्गातील विद्यार्थ्यांची भाषा, गणित, परिसर तर आठवीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्र या विषयांची चाचणी घेण्यात आली. दहावीच्या विद्यार्थ्यांची भाषा, गणित, विज्ञान, सामाजिक शास्त्रासह इंग्रजीची चाचणी करण्यात आली. या सर्वेक्षणाचा अहवाल परिषदेने बुधवारी रात्री जाहीर केला. मुंबई, ठाणे आणि परिसरातील विद्यार्थी, शाळांची खालावलेली शैक्षणिक स्थिती या अहवालातून (पान ३ वर)

शैक्षणिक दैना चव्हाटय़ावर

ठळकपणे समोर आली आहे. करोनाच्या साथीमुळे राज्यात सर्वाधिक काळ शाळा बंद असल्याचा परिणाम विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीवर झाल्याचे दिसते आहे.

पाचवी, आठवी, दहावीच्या विद्यार्थ्यांनी गणित, विज्ञानातील कामगिरी ही पन्नास टक्क्यांपेक्षाही कमी आहे. तुलनेने सोपे समजले जाणारे भाषा आणि सामाजिक शास्त्र विषयांची परिस्थितीही फारशी वेगळी नाही. मुंबई उपनगरातील सर्वेक्षणात सहभागी झालेल्या दहावीच्या विद्यार्थ्यांपैकी ९५ टक्के विद्यार्थ्यांना विज्ञानातील तर ९१ टक्के विद्यार्थ्यांना सामाजिक शास्त्र विषयांतील प्राथमिक संकल्पनाही स्पष्ट झालेल्या नाहीत.  गणिताबाबत हे प्रमाण ५५ टक्के तर इंग्रजी वगळता इतर भाषांबाबत ७१ टक्के आहे. कठीण मानल्या जाणाऱ्या इंग्रजीची स्थिती तुलनेने बरी असून प्राथमिक संकल्पना स्पष्ट न झालेल्या विद्यार्थ्यांचे प्रमाण ४० टक्के आहे. शहर भागांतील विद्यार्थ्यांची स्थिती ही उपनगरातील शाळांमध्ये जाणाऱ्या विद्यार्थ्यांच्या तुलनेत बरी आहे.

खेळांबाबत निरुत्साह

आठवी आणि दहावीचे विद्यार्थी शाळेतील खेळाच्या किंवा शारीरिक शिक्षणच्या तासाबाबत निरुत्साही असल्याचे दिसते. शाळेच्या वेळापत्रकात खेळांसाठी राखीव असलेल्या वेळेत मैदानावर जाऊन खेळण्याबाबत सर्वेक्षणात माहिती विचारण्यात आली होती. उपनगरातील शाळांतील दहावीच्या वर्गातील अवघ्या ४० टक्के विद्यार्थ्यांनी मैदानावर खेळण्यासाठी जात असल्याचे सांगितले आहे. ठाण्यातील आठवीच्या वर्गातील ५० टक्केच विद्यार्थ्यांनी खेळाच्या तासाला मैदानावर जाऊन खेळत असल्याचे सांगितले.

पायाभूत सुविधांचा अभाव

शाळेची इमारत, पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची उपलब्धता यांबाबत शिक्षकांना प्रश्न विचारण्यात आले होते. मुंबई उपनगरातील शाळांपैकी २० टक्के इमारती धोकादायक असल्याचे उत्तर आठवीच्या वर्गाला शिकवणाऱ्या शिक्षकांनी दिले आहे, तर ११ टक्के शाळांमध्ये पिण्याचे पाणी नसल्याचे शिक्षकांचे म्हणणे आहे. करोनाच्या कालावधीत ऑनलाइन वर्ग सुरू असताना मुंबई उपनगरातील पाचवीच्या वर्गातील ४० टक्के विद्यार्थ्यांच्या घरी इंटरनेट उपलब्ध नसल्याचे दिसत आहे.

मुलांना काय येत नाही?

इयत्तेनुसार निश्चित करण्यात आलेले अध्ययन निष्पत्ती निकष म्हणजेच इयत्तेनुसार विद्यार्थ्यांना कोणत्या संकल्पना स्पष्ट व्हाव्यात, कौशल्ये विकसित व्हावीत याचा आराखडा आधारभूत मानून विद्यार्थ्यांची चाचणी घेण्यात आली होती. त्यानुसार दहावीचे विद्यार्थी एखाद्या प्रसंगावरून मत मांडणे, विधान करणे यात मागे आहेत. व्यवस्था, सामाजिक प्रक्रिया कशा होतात याबाबतही विद्यार्थ्यांना संकल्पना समजल्या नसल्याचे दिसते आहे. आठवीच्या विद्यार्थ्यांना मूलभूत अधिकार, त्याचे उल्लंघन, कर्तव्ये कळलेली नाहीत. विज्ञान विषयांतील संकल्पनांचा प्रत्यक्षात वापर विद्यार्थ्यांना जमत नसल्याचे दिसते आहे. पाचवीच्या विद्यार्थ्यांना परिसर अभ्यास विषयांत आरोग्य, स्वच्छता, कचऱ्याचे वर्गीकरण या संबंधित घटक कळलेले नाहीत.