scorecardresearch

शाळांच्या पुनरारंभाला पट दमदार पहिल्या दिवशी

करोना रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला.

७० टक्के विद्यार्थी उपस्थित

मुंबई : करोना रुग्णसंख्या कमी असलेल्या जिल्ह्यांमध्ये २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला. त्यानुसार सोमवारी मुंबईतीत शाळांची घंटा घणघणली. डिसेंबर महिन्याच्या तुलनेत शाळांमधील विद्यार्थी संख्या वाढल्याची माहिती शिक्षकांनी दिली. सोमवारी बहुतांशी शाळांमध्ये ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी हजर होते.

 करोनाची दुसरी लाट ओसरल्यानंतर पाचवी ते दहावी ऑक्टोबर महिन्यात तर पहिले ते चौथीचे वर्ग डिसेंबर महिन्यात सुरू करण्यात आले. परंतु त्यावेळी पालकांच्या मनात सुरक्षितता आणि संसर्गाबाबत अनेक शंका असल्याने प्रत्यक्ष शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या काहीशी कमी होती. त्यानंतर ओमायक्रॉनचा वाढता संसर्ग लक्षात घेऊन राज्य सरकारने जानेवारीच्या पहिल्या आठवडय़ात १५ फेब्रुवारीपर्यंत पुन्हा शाळा बंद ठेवण्याचा निर्णय घेतला. मात्र, करोनास्थिती फारशी चिंताजनक नसल्याचे लक्षात आल्याने तसेच शाळा सुरू करण्याची मागणी सर्व स्तरांमधून होऊ लागल्यामुळे राज्य सरकारने २४ जानेवारीपासून शाळा सुरू करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार शिक्षकांनी पालकांशी संवाद साधून त्यांच्या मनात विश्वास निर्माण करण्यासाठी प्रयत्न केले. त्यामुळे सोमवारी शाळांमध्ये मोठय़ा उत्साहात वर्ग भरले. उच्च माध्यमिकच नव्हे, तर माध्यमिक वर्गामध्येही विद्यार्थी मोठय़ा संख्येने हजर होते.  ‘पहिल्याच दिवशी ७० टक्क्यांहून अधिक विद्यार्थी शाळेत आले. पालकांच्या मनातील भीती दूर करण्यात आम्हाला यश मिळाले आहे. त्यामुळे मागच्या तुलनेत अधिक विद्यार्थी प्रत्यक्ष शाळेत हजार झाले,’ असे दहिसर येथील स्वामी विवेकानंद एज्युकेशन सेंटरच्या मुख्याध्यापिका सुरेखा सुडे यांनी सांगितले.

पालकांमध्ये अजूनही भीती

 पहिल्या दिवशी शाळांमध्ये मोठय़ा प्रमाणात विद्यार्थी हजार झाले असले तरी काही शाळांमध्ये अजूनही पालकांकडून संमतीपत्र मिळण्यास अडचण येत आहे. विद्यार्थ्यांमध्ये शाळेत येण्याची उत्सुकता असतानाही पालकांच्या मनात संभ्रम असल्याने ते शाळेत येऊ शकत नाही. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेत शाळा कुठेही हयगय करणार नाही याबाबत पालकांनी शाळांवर विश्वास दाखवायला हवा,’ अशी खंत काही शाळांतील शिक्षकांनी मांडली.

शाळेची स्वच्छता आणि निर्जंतुकीकरण यांचे काम अंतिम टप्प्यात आले असून २७ जानेवारीपासून आम्ही प्रत्यक्ष शाळा सुरू करणार आहोत. त्यादृष्टीने पालकांशी संवाद साधून संमतीपत्र घेण्यात आले आहे. सध्या ६० टक्क्यांहून अधिक पालकांनी परवानगी दिली असून येत्या दोन दिवसात अधिक प्रतिसाद वाढेल.

– सदाशिव पाटील, मुख्याध्यापक, बालमोहन विद्यामंदिर, दादर

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Students first day school resumption ysh

ताज्या बातम्या