मुंबई : महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषेचे धडे गिरवायला मदत करणाऱ्या पहले अक्षर फाउंडेशनच्या माध्यमातून पालिकेच्या शाळेतील ७८ विद्यार्थ्यांच्या चमूने काळा घोडा कला महोत्सवात निसर्गरक्षण व हवामानबदल विषयावर नाटकाचे सादरीकरण केले. भाषा शिक्षण, पर्यावरणीय जागरूकता आणि बालमनाची कल्पनाशक्ती यांचा सुरेख संगम असलेल्या ‘द व्हिस्परिं वूड्स ईशान्स जर्नी’ या इंग्रजी भाषेतील संगीत नाटकात १० ते १३ वयोगतील विद्यार्थ्यांचा समावेश होता. त्यामुळे विद्यार्थ्यांना नेपथ्य, नाट्यकला आणि अभिनय क्षेत्रातील विविध गोष्टी जवळून पाहण्याची संधी मिळाली.

मुंबई महानगरपालिका प्रशासन शाळांचा दर्जा व शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी वेळोवेळी विविध उपाययोजना व उपक्रम राबवित असते. त्याअंतर्गत महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजी भाषा शिकविण्यासाठी महापालिकेने पहले अक्षर फाऊंडेशनसोबत करार केला आहे. अनेक वर्षांपासून महापालिका शाळेतील विद्यार्थ्यांना इंग्रजीचे धडे दिले जातात.

पाच वर्षांपासून फाउंडेशनकडून पालिका शाळेतील शिक्षकांनाही प्रभावी अध्यापन कौशल्याचे धडे दिले जातात. रंगभूमीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास निर्माण करणे, त्यांना व्यासपीठ उपलब्ध करून देणे, तसेच संवादकौशल्य सुधारण्यासाठी फाउंडेशनने पुढाकार घेत विद्यार्थ्यांचे इंग्रजीत नाटक बसविले. गतवर्षीही त्यांनी निसर्गरक्षण, जनजागृती विषयाला अनुसरून नाटक सादर केले होते. यंदा पहले अक्षर फाऊंडेशनच्या माध्यमातून महापालिका शाळेतील ७८ विद्यार्थ्यांनी ‘द व्हिस्परिंग वूड्स ईशान्स जर्नी’ या इंग्रजी नाटकाचे सादरीकरण केले.

भाषा शिक्षणासाठी नाट्यकला अधिकच प्रभावी ठरते. विद्यार्थ्यांची इंग्रजीतील शब्दसंपदा वाढत असून उच्चार देखील सुधारत आहेत. याचा त्यांच्या शैक्षणिक आणि व्यावसायिक जीवनात नक्कीच फायदा होतील, असे मत पहले फाउंडेशनच्या अधिकाऱ्यांनी व्यक्त केले.