मुंबई : महापरिनिर्वाण दिनानिमित्त शीव येथील गुरू नानक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित उपक्रमात ‘६८ तास अभ्यास’ करून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहिली.
शीव येथील गुरु नानक महाविद्यालयातील राज्यशास्त्र विभाग आणि संविधान क्लब यांच्या संयुक्त विद्यमाने ‘६८ तास अभ्यास’ हा उपक्रम २८ नोव्हेंबर ते ६ डिसेंबर या कालावधीत महाविद्यालयात राबविण्यात आला. दररोज सकाळी ७.३० ते सायंकाळी ५ वाजेपर्यंत अभ्यास करून विद्यार्थ्यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना आदरांजली वाहण्यात आली. विद्यार्थ्यांनी शैक्षणिक पाठ्यपुस्तकांचा अभ्यास करून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर आधारित पुस्तकांचेही वाचन केले. तसेच महाविद्यालयाच्या ग्रंथालयातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर व संविधानावर आधारित पुस्तकांचे प्रदर्शन भरवण्यात आले होते. व्याख्याने आणि चर्चासत्रेही पार पडली. महापरिनिर्वाण दिनी ६ डिसेंबर रोजी चैत्यभूमीवर जाऊन डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करून ‘६८ तास अभ्यास’ या उपक्रमाची सांगता करण्यात आली. ‘६८ तास अभ्यास’ हा उपक्रम गुरु नानक महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. पुष्पिन्दर कौर भाटिया यांच्या मार्गदर्शनाखाली आणि राज्यशास्त्र विभागप्रमुख प्रा. सुमित खरात यांच्या संकल्पनेतून राबविण्यात आला.