भूमिती, जीवशास्त्र यातील किचकट संकल्पना अभ्यासनाट्याच्या रुपात साकार होत होत्या. गणित, विज्ञान इतकेच काय, पण अनेकांना मराठी भाषेचीही भीती असते. पण हे विषय जेव्हा रंगमंचावर ‘अभ्यासनाट्य’च्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी सादर केले, तेव्हा उपस्थित प्रेक्षक अचंबित झाले. ‘अभ्यासाचे नाटक काय पाहायला जायचे?’ असे वाटत असतानाच आपल्या पाल्यासाठी म्हणून अभ्यासनाट्य पाहायला आलेले पालकही अभ्यास नाट्याद्वारे सादर होत आहे, हे पाहून आश्चर्यचकीत झाले. आमच्या वेळी असे असते तर आम्हीही जास्त मार्क मिळवले असते, अशी सहज भावना त्यांच्या तोंडून नकळतच आली. हे सगळं सादरीकरण होत होते ते ‘नाट्यसंस्कार कला अकादमी’ने आयोजित केलेल्या ‘चवथ्या आंतरशालेय अभ्यासनाट्य स्पर्धे’मध्ये. या स्पर्धेत पुणे आणि पिंपरी-चिंचवड परिसरातील तेरा शाळांनी सहभाग नोंदवला होता.

भूमितीतील रचनांवर ‘विदुषक भौमितिक आकारांचा’ हे अभ्यासनाट्य जसे सादर झाले तसेच जीवशास्त्रातील पेशींवर ‘किल्ले पेशीगड’ हे अभ्यासनाट्य सादर करण्यात आले.

मुलांमधील ऊर्जेद्वारे अभ्यासातल्या संकल्पना साध्या-सोप्या भाषेत उपस्थितांना समजत होत्याच, पण या अभ्यासनाट्यांचे लेखन करणाऱ्या शिक्षकांचेही प्रेक्षकांना कौतुक वाटत होते. या स्पर्धा शाळाशाळांमधे, त्या-त्या इयत्तेच्या वर्गातील विद्यार्थ्यांकडून प्राथमिक सादरीकरण करण्यात आले होते. नंतर त्याचे रंगमंचीय सादरीकरण करण्यात आले. या वेळी स्पर्धेतील विजेत्यांना पारितोषिकांचे वितरण आणि मानसी योगेश कुलकर्णी यांनी लिहिलेल्या ‘अभ्यासनाट्य’ या पुस्तकाचे प्रकाशन करण्यात आले. तसेच ‘सुमन नाट्यछटा लेखन स्पर्धे’तील विजेत्यांना बक्षिसे वितरीत करण्यात आली. पारितोषिके देण्यासाठी शशिकांत जोशी, मिलिंद सबनीस, राजेंद्र लाटकर आदी उपस्थित होते. या स्पर्धेचे परीक्षण पुष्कर देशपांडे, संध्या कुलकर्णी, रेखा जोशी, प्रकाश पारखी, अनुराधा कुलकर्णी, दिपाली निरगुडकर यांनी केले होते.

स्पर्धेचा निकाल

गट क्रमांक १ : प्रथम – सिल्वर क्रेस्ट शाळा सिंहगड रोड, द्वितीय – नवीन मराठी शाळा, तृतीय – श्रीमती पार्वतीबाई विद्यालय श्रीधरनगर, चिंचवड. उत्तेजनार्थ – दादा गुजर प्राथमिक विद्यालय हडपसर, श्रीमती पार्वतीबाई विद्यालय चिंचवड.

गट क्रमांक २ : प्रथम – सिल्वर क्रेस्ट सिंहगड रोड, द्वितीय – प्रतिभा पवार स्कूल, तृतीय – कॅम्प एज्युकेशन सोसायटीची डॉ. सायरस पूनावाला कन्या शाळा पुणे, उत्तेजनार्थ – प्रतिभा पवार स्कूल, ह. भ. प. पाटील म.न.पा. शाळा क्रमांक २०५ वारजे, सम्राट अशोक विद्यामंदिर म.न.पा. क्र. ३ जी कर्वेनगर.

गट क्रमांक ३ : प्रथम – अभिजात माध्यमिक विद्यालय, उत्तेजनार्थ – एम. एस. एस. हायस्कूल चिंचवड, इंग्लिश मीडियम.