मुंबई शहरात होत असलेल्या मेट्रो-३ प्रकल्पामुळे वृक्षसंपदेची हानी टाळण्यासाठी आणि वृक्षतोडीमुळे होणाऱ्या परिणामांचा अभ्यास करण्यासाठी मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचा एक गट स्थापन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. मुंबई मेट्रो रेल्वे कॉर्पोरेशनच्या अधिकाऱ्यांचा गट प्रामुख्याने नागरिकांसोबत संवाद साधणार आहे. याशिवाय कमीत कमी वृक्षतोड करण्याबाबत विचारविनिमय करणार आहे.

मुंबई शहरात मेट्रो प्रकल्पामुळे वृक्षसंपदेची हानी होत असल्याची तक्रार घेऊन नागरिकांच्या एका शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मंगळवारी भेट घेतली. या शिष्टमंडळात आशीष पॉल, नीना वर्मा, परवीन जहांगीर, संजय अशर, झोरू भाथेना यांचा समावेश होता. ‘मेट्रो प्रकल्पाला आमचा विरोध नाही. हा प्रकल्प नागरिकांसाठी आवश्यक असून यामुळे प्रदूषण कमी होण्यास मदत होणार आहे,’ असे या शिष्टमंडळाने स्पष्ट केले. ‘मेट्रो रेल्वे हा वाहतुकीचा किफायतशीर पर्याय असून त्यामुळे कार्बन फूटप्रिंट कमी होण्यास मदत होते,’ या मुख्यमंत्र्यांच्या मताशी शिष्टमंडळाने सहमती दर्शविली.