लोकसत्ता प्रतिनिधी
प्रख्यात लेखिका अगाथा ख्रिस्ती यांच्या सर्वच पुस्तकांनी प्रसिद्धीची शिखरे गाठली आहेत. सन १९५२ मध्ये त्यांचे ‘माऊस ट्रॅप’ हे नाटक रंगभूमीवर आले आणि या नाटकाने इतिहास घडवला. गेली सात दशके त्यांचे हे नाटक लंडन येथे सुरू आहे. या नाटकाने आतापर्यंत पंचवीस हजार प्रयोगांचा टप्पा पार केला आहे. अमाप लोकप्रियता मिळवणारे हे नाटक आता मराठी रंगभूमीवर ‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नावाने आले आहे.
‘सुभेदार गेस्ट हाऊस’ या नाटकाचे लेखन शिरीष देखणे यांनी केले आहे. रहस्यमय बाजाची नाटके रंगभूमीवर आणण्यात हातखंडा असलेले दिग्दर्शक विजय केंकरे यांनी या नाटकाचे दिग्दर्शन केले आहे. शंतनू मोघे, सौरभ गोखले, अंगद म्हसकर, मृण्मयी गोंधळेकर, विनिता दाते, आनंद पाटील, सना कुलकर्णी, रोहित देशमुख ही आघाडीची कलावंत मंडळी या नाटकात आहेत. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ ही संस्था या नाटकाच्या निमित्ताने पुन्हा एकदा नाट्यनिर्मितीत उतरली आहे. ‘धि गोवा हिंदू असोसिएशन’ व ‘सुकल्प चित्र’ यांनी या नाटकाची निर्मिती केली असून नेपथ्य प्रदीप मुळ्ये यांचे आहे आणि नाटकाला अजित परब यांनी संगीत दिले आहे. शीतल तळपदे यांनी नाटकाची प्रकाशयोजना केली आहे. या नाटकाचे प्रयोग सध्या मोठ्या धडाक्यात रंगभूमीवर सुरू आहेत.
