‘सिंधुरक्षक’ला जलसमाधी

मंगळवारी मध्यरात्री नौदल गोदीत उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवरील क्षेपणास्त्र आणि पाणतीरांच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला

मंगळवारी मध्यरात्री नौदल गोदीत उभ्या असलेल्या आयएनएस सिंधुरक्षक या पाणबुडीवरील क्षेपणास्त्र आणि पाणतीरांच्या स्फोटांनी संपूर्ण परिसर हादरून गेला आणि स्वातंत्र्यदिनाच्या आदल्या दिवशीच, बुधवारी भारतीय नौदलाला त्यांच्या इतिहासातील सर्वात भीषण दुर्घटनेला सामोरे जावे लागले. आगीच्या ज्वाळांनी वेढलेल्या पाणबुडीने त्यानंतरच्या दोन तासांतच तळ गाठला आणि त्यानंतर यात अडकलेल्या १८ नौसैनिकांच्या जीविताच्या आशेवर निराशेची काळोखी पसरली. दरम्यान, ही दुर्घटना घडली त्यावेळेस पाणबुडीच्या वरच्या बाजूस कार्यरत असलेल्या तीन नौसैनिकांचे प्राण मात्र वाचले. दरम्यान, भारतीय नौदलाने या संदर्भात सखोल चौकशी मंडळ नियुक्त केले असून चार आठवडय़ांत या मंडळाचा अहवाल सादर होणार आहे. दुर्घटनेच्या वेळेस तिथेच बाजूला असलेल्या आयएनएस सिंधुघोष या पाणबुडीच्या बाह्यभागालाही या स्फोटाचा फटका बसला मात्र ती वेगात घटनास्थळापासून दूर नेण्यात नौदलाला यश आहे. त्यामुळे अधिक हानी टळली.
या भीषण दुर्घटनेनंतर भारतीय नौदलातील सर्व पाणबुडय़ांना तातडीने घटनास्थळी आणण्यात आले असून २४ तास मदत कार्याला सुरुवात झाली आहे. सुरुवातीच्या दोन तासांतच आग नियंत्रणात आणण्यात यश आले मात्र त्याचवेळेस पाणबुडीने सागरतळाच्या दिशेने प्रवासाला सुरुवातही केली. सिंधुरक्षकचा एका बाजूचा भाग केवळ पाण्यावर डोके काढून आहे. बहुसंख्य भाग पाण्याखाली असून परिसरातील चिखल मिश्रित सागरी पाण्यामुळे पाण्याखालची दृश्यात्मकता कमी झाली आहे. त्यामुळेच पाणबुडय़ांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागते आहे. मध्यरात्री सुरू झालेल्या या मदतकार्याला पहिले यश दुपारच्या सुमारास आले. त्यावेळेस पाणबुडय़ांना पाणबुडीच्या पहिल्या दरवाजापर्यंत पोहोचण्यास यश आले. अद्याप १८ नौसैनिक आत अडकलेल्या अवस्थेत आहेत. जीवरक्षक विभागापर्यंत त्यातील किती जणांना पोहोचता आले किंवा त्यातील किती जणांच्या हाती जीवरक्षक उपकरणे लागली, याबाबत कोणतीही खात्रीशीर माहिती उपलब्ध नाही. ही दुर्घटना घडून वीस तास उलटल्यानंतरही आत अडकलेल्यांसंबधी कोणतीच अधिकृत माहिती उपलब्ध होत नव्हती. रात्री उशिरा पाणबुडीत उपलब्ध असलेल्या सर्व संपर्क यंत्रणांचा वापर त्यांच्यापर्यंत पोहोचण्यासाठी करण्यात आला, मात्र त्यातही कोणतेही यश आले नाही. त्याबाबत नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी म्हणाले, ‘पाणबुडीमध्ये काही काळ अशा अवस्थेत माणूस तग धरू शकतो. पण तो काळ किती असेल हे सांगता येत नाही. अनेकदा चमत्कार होत असतात. आम्हाला आशा आहे सर्व नौसैनिक सुखरूप असतील.’
तब्बल १६ वर्षे वापरलेली आयएनएस सिंधुरक्षक तिचे आयुष्यमान वाढविण्यासाठी रशियन गोदीत पाठविण्यात आली होती. एप्रिल महिन्यात तिथून परतल्यानंतर ती सेवेत नियमित कार्यरत होती. त्यावर एकूण ५८ कर्मचारी कार्यरत होते. तीनच दिवसांपूर्वी तिची बॅटरीही पूर्णपणे चार्ज करण्यात आली होती. काल केवळ १८ कर्मचारी आतमध्ये तर तीन बाह्यावरणावर कार्यरत असताना अचानक स्फोट होण्यास सुरुवात झाली. पाणतीर आणि क्षेपणास्त्र असलेल्या भागांमध्ये हे स्फोट झाले. या स्फोटांचा आवाज दोन किलोमीटर्सच्या परिसरात अतिशय व्यवस्थित ऐकू आला. आणि त्यानंतर नौदल गोदीवर  लालभडक ज्वालानृत्यच सुरू झाले. अनेकांनी हे पाहण्यासाठी गेट वे ऑफ इंडियाच्या दिशेने धाव घेतली. तिथून हे दृश्य लांब असले तरी नजरेस पडत होते. तोपर्यंत मुंबई महापालिकेच्या अग्निशमन दलाच्या गाडय़ाही मोठी कुमकही घटनास्थळी पोहोचली होती.
दरम्यान, या पाणबुडीशेजारीच असलेल्या आयएनएस सिंधुघोषलाही या स्फोटाच्या झळा बसू लागल्या. त्यावेळेस तातडीने ती पाणबुडीही घटनास्थळावरून हलविण्यात आली. मात्र तोवर त्याच्या बाह्यावरणावर स्फोटाचे दणके बसलेले होते. याशिवाय बाजूलाच काही युद्धनौकाही नांगरण्यात आल्या होत्या. त्या सर्वाना बाजूला करत परिसर मोकळा करण्यात आला. तोपर्यंत नौदलाचे पाणबुडेही तिथे दाखल झाले होते. मोठे प्रकाशस्रोत घेऊन पाणबुडय़ांनी उडय़ाही मारल्या मात्र चिखलमिश्रीत पाणी शिवाय असलेला काळोख यामुळे उजाडल्याशिवाय काहीच करता येणे शक्य नाही हे तोपर्यंत स्पष्ट झाले होते.
नौदल गोदीमधील आपत्कालीन यंत्रणा तात्काळ कार्यान्वित करण्यात आली. घटनेचे महत्त्व लक्षात येताच नौदलातील सर्व अतिवरिष्ठ अधिकारीही घटनास्थळी दाखल झाले. स्फोटानंतरच्या पहिल्या दोन तासांतच पाणबुडी सागरतळ गाठला तेव्हा वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घटनास्थळीच सुरू होती. केवळ पाणबुडीचे एक टोक तेवढेच पाण्यावर दिसते आहे. सकाळी उजाडल्या उजाडल्या पाणबुडय़ांनी पाणबुडीचे सर्वेक्षण सर्व बाजूंनी करण्यास सुरुवात केली. प्राथमिक अंदाजानंतर पुन्हा नव्याने सुटकेसाठीचा प्रारूप आराखडा तयार करण्यात आला.
दरम्यान दुपारनंतर संरक्षणमंत्री ए. के. अँटोनी आणि नौदलप्रमुख अॅडमिरल डी. के. जोशी, मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी घटनास्थळी जाऊन मदतकार्याची पहाणी केली. त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत नौदलप्रमुख म्हणाले की, पाणबुडीची बॅटरी चार्ज होत असताना निर्माण होणाऱ्या हायड्रोजनची मात्र वाढली आणि त्यामुळे क्षेपणास्त्र आणि पाणतीरांमध्ये रासायनिक प्रक्रिया होत भडका उडाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र या पाणबुडीचे चार्जिंग तीन दिवसांपूर्वीच झालेले होते. त्यामुळे तशी शक्यता नाही. उर्वरित शक्यता चौकशीनंतरच लक्षात येतील.
दुर्घटना एवढय़ा वेगात घडली की, त्यामुळे आत अडकलेल्या नौसैनिकांना प्राण वाचविण्यासाठी किती अवधी मिळाला हे सांगणे कठीणच आहे, असेही त्यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात सांगितले.

१६ वर्षांचा सहवास
१९९७ मध्ये भारतीय नौदलात सामील झालेल्या सिंधुरक्षकचे आयुष्यमान वाढवण्यासाठी तिची रवानगी रशियन गोदीत करण्यात आली होती. एप्रिल महिन्यातच ती परतली होती. तेव्हापासून ती नियमित कार्यरत होती. या पाणबुडीवर एकूण ५८ कर्मचारी होते.
तीनच दिवसांपूर्वी तिची बॅटरीही पूर्णपणे चार्ज करण्यात आली होती. मंगळवारी मध्यरात्री केवळ १८ कर्मचारी आतमध्ये, तर तीन बाह्य़ावरणावर कार्यरत असताना अचानक स्फोट होण्यास सुरुवात झाली. पाणतीर आणि क्षेपणास्त्र असलेल्या भागांमध्ये हे स्फोट झाले. त्यानंतर सिंधुरक्षकचा १६ वर्षांच्या सहवासाला कायमचा पूर्णविराम मिळाला. पाणबुडीची बॅटरी चार्ज होत असताना निर्माण होणाऱ्या हायड्रोजनची मात्रा वाढली आणि त्यामुळे क्षेपणास्त्र आणि पाणतीरांमध्ये रासायनिक प्रक्रिया होत भडका उडाल्याची प्राथमिक शक्यता व्यक्त केली जात होती. मात्र, चार्जिग तीन दिवसांपूर्वीच झाल्याने ती शक्यताही फेटाळून लावण्यात आली आहे.

घातपाताची शक्यता फेटाळली नाही
या दुर्घटनेमागे घातपाताची शक्यता आहे काय? या प्रश्नावर नौदल प्रमुख अॅडमिरल जोशी उत्तरले की, घातपाताची शक्यता कमी आहे मात्र चौकशी पूर्ण झाल्याशिवाय कोणताही निष्कर्ष काढता येणार नाही. त्यामुळे ती पूर्णपणे फेटाळलेलीही नाही!

पाणबुडीमध्ये काही काळ अशा अवस्थेत माणूस तग धरू शकतो, पण तो काळ किती असेल हे सांगता येत नाही. अनेकदा चमत्कार होत असतात. आम्हाला आशा आहे सर्व नौसैनिक सुखरूप असतील. दुर्घटना एवढय़ा वेगात घडली की, त्यामुळे आत अडकलेल्या नौसैनिकांना प्राण वाचविण्यासाठी किती
अवधी मिळाला हे सांगणे कठीणच आहे.डी. के. जोशी, नौदल प्रमुख

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

मराठीतील सर्व मुंबई बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App. ताज्या बातम्या (latest News) फेसबुक , ट्विटरवरही वाचता येतील.

Web Title: Submarine ins sindhurakshak sinks after serial blasts 18 navymen still missing