शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरू करण्याबाबत प्रस्ताव सादर करा – टोपे

टोपे यांच्या दालनात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली.

मुंबई : राज्यातील होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत राज्यशासन सकारात्मक आहे, अशी ग्वाही देताना राज्यात शासकीय होमिओपॅथी दवाखाने सुरू करण्यासंदर्भात प्रस्ताव वित्त विभागास त्वरित सादर करण्याचे निर्देश आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी मंगळवारी दिले.

टोपे यांच्या दालनात होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांबाबत बैठक झाली. आमदार विक्रम काळे, आरोग्य विभागाचे आयुक्त डॉ. रामास्वामी, महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेचे अध्यक्ष डॉ. उत्तुरे, आयुष संचालक डॉ. कोहली, केंद्रीय होमिओपॅथी परिषदेचे माजी उपाध्यक्ष डॉ. अरुण भस्मे यावेळी उपस्थित होते.

होमिओपॅथी डॉक्टरांना नियुक्ती मिळण्यासंदर्भात न्यायालयाच्या निर्णयांबाबत विधि व न्याय विभागाचे मत घेण्यात येईल. केंद्रीय आरोग्यमंत्र्यांच्या भेटीत होमिओपॅथी वैद्यकीय व्यावसायिकांच्या मागण्यांसंदर्भात चर्चा केली जाईल, असे टोपे यांनी सांगितले.  सीसीएमपी अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या बीएचएमएस डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी मिळण्यासंदर्भात विधि व न्याय विभागाचे अभिप्राय घेण्याचे निर्देश आरोग्यमंत्र्यांनी दिले.

Loksatta Telegram लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

Web Title: Submit proposal to start a government homeopathy clinic says rajesh tope zws