लोकसत्ता खास प्रतिनिधी
मुंबई : बेकायदेशीरपणे २० कोटी रुपयांचा लाभ घेण्यासाठी उच्च न्यायालयात बनावट कागदपत्र सादर केल्याच्या आरोपाखाली चौघांविरोधात आझाद मैदान पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणाचा पुढील तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
तक्रारदार चिराग शहा यांच्या तक्रारीवरून याप्रकरणी फसवणूक, बनावट कागदपत्र सादर केल्याप्रकरणी चौघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली. शहा हे गुंतवणूक सल्लागार आहेत. तक्रारीनुसार, आरोपींना तक्रारदाराला २० कोटी रुपये द्यायचे होते. पण आरोपींनी बनावट कागदोपत्रे व इलेक्ट्रॉनिक पुरावे सादर करून संबंधित रक्कम देण्यात आल्याचे भासवले. तसेच संबंधित खोटे पुरावे उच्च न्यायालयात सादर केले.
आणखी वाचा-नऊ वर्षांनी एसटी महामंडळ नफ्यात
याप्रकरणी न्यायालयाने आरोपींविरोधात दोन आठवड्यांत गुन्हा दाखल करून त्याचा अहवाल न्यायालयाला सादर करण्यास सांगितला होते. शहा यांच्या तक्रारीवरून बुधवारी आझाद मैदान पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्ह दाखल करण्यात आला. आरोपी पुणे, सिंधुदुर्ग व मुंबईतील रहिवासी आहेत. याबाबतचा तपास आर्थिक गुन्हे शाखा करणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.