लोकसत्ता प्रतिनिधी

मुंबई : जन्मत:च स्वरयंत्राचा पक्षाघात झालेल्या बाळावर वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी यशस्वी उपचार करून त्याला जीवदान दिले. नवजात बाळांमध्ये दुहेरी स्वरयंत्रासंबंधित पक्षाघात दुर्मिळ आहे. या आजारामध्ये स्वरयंत्रात असणाऱ्या दोन्ही स्वरतंतूंची हालचाल पूर्ण किंवा अंशतः बंद होते. यामुळे बाळची बोलण्याची क्षमता नष्ट होते.

बाळ झाल्यामुळे राखी आणि संदेश खारवी दाम्पत्य आनंदात होते. मात्र बाळाला श्वासोच्छवासासंबंधी त्रास होवू लागल्याने पालक चिंतीत झाले होते. ६ ते १२ तासांच्या आत त्याच्यावर स्थानिक रुग्णालयात केलेली शस्त्रक्रिया अयशस्वी ठरल्याने त्याला तातडीने वाडिया रुग्णालयात दाखल करण्यात आले. सात दिवसांच्या या अर्भकाला जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. सीटी स्कॅन आणि ब्रॉन्कोस्कोपिक मूल्यांकनानंतर स्वरयंत्रासंबंधी पक्षाघाताचे निदान झाले. नवजात मुलांमध्ये दुहेरी स्वरयंत्रासंबंधित पक्षाघात दुर्मिळ आहे. या आजारामध्ये स्वरयंत्रात असणाऱ्या दोन्ही स्वरतंतूंची हालचाल पूर्ण किंवा अंशतः बंद होते.

आणखी वाचा-अभिनेता सलमान खानचा गुन्हे शाखेने जबाब नोंदवला

वेळेवर निदान आणि उपचारावर जोर देत वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांनी सबग्लोटिक बलुनसह एन्डोस्कोपिक क्रिकॉइड या पद्धतीने शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. या पद्धतीने ११ मे रोजी बाळावर तब्बल अडीच तास शस्त्रक्रिया करण्यात आली. यशस्वी शस्त्रक्रियेनंतर नवजात बाळाला दोन आठवडे जीवन रक्षक प्रणालीवर ठेवण्यात आले. या तंत्राची परिणामकारकता, अचूकता, सुरक्षित आणि जलद पुनर्प्राप्तीने लहान मुलांच्या वायुमार्गाच्या विकारांचे रूपांतर करण्याची क्षमता यामुळे बाळाच्या प्रकृतीमध्ये लवकर सुधारणा झाली. ६ जून रोजी बाळाला घरी सोडण्यात आले. नवजात शिशु तज्ज्ञ तसेच कान, नाक, घसा विकार तज्ज्ञांच्या तुकडीने या बाळावर यशस्वी उपचार केले. बाळाला नवीन आयुष्य मिळाल्याबद्दल संदेश खारवी यांनी वाडिया रुग्णालयातील डॉक्टरांचे आभार मानले.