महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे मागील काही काळापासून हीप बोन या आजाराने त्रस्त आहेत. पुण्यातील एका सभेतून त्यांनी याबाबतची माहिती दिली होती. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात राज ठाकरे यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येणार होती. मात्र, करोनाची लागण झाल्यामुळे ती पुढे ढकलण्यात आली. अखेर काही दिवसांपूर्वी लीलावती रुग्णालयात राज ठाकरेंवर शस्त्रक्रिया करण्यात आली. त्यानंतर आता राज ठाकरे आपल्या घरी परतले आहेत. राज ठाकरेंनी ट्विट करत याबाबत माहिती दिली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

“आपल्या आशिर्वादाने आणि प्रार्थनेने माझी शस्त्रक्रिया व्यवस्थिरतरित्या पार पडली! काही वेळापूर्वीच रुग्णालयामधून बाहेर पडून मी घरी पोहोचलो आहे. आपले आशिर्वाद आणि प्रेम असेच कायम असो!” असे राज ठाकरेंनी म्हटले आहे.

मनसे अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांच्यावर लीलावती रुग्णालयात यशस्वीपणे शस्त्रक्रिया पार पडली होती. लीलावती रुग्णालयातील ज्येष्ठ शल्यविशारद डॉ. विनोद अग्रवाल आणि त्यांच्या वैद्यकीय सहकाऱ्यांनी ही शस्त्रक्रिया केली.  राज ठाकरे यांची प्रकृती सध्या स्थिर असून डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली त्यांच्यावर उपचार केले जात असल्याची माहिती मनसे प्रवक्त्यांनी दिली होती.

दरम्यान, राज ठाकरे यांच्यावरील शस्त्रक्रिया निर्विघ्नपणे पार पडावी, यासाठी मनसे कार्यकर्त्यांकडून मुंबईत महाआरती आणि पूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच मनसेच्या महाराष्ट्र चर्मोद्योग कामगार सेनेतर्फे गणेश मंदिर आणि हनुमान मंदिरात महाआरतीचे आयोजनही करण्यात आलं होतं.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Successfully completed surgery on raj thackeray abn
First published on: 25-06-2022 at 11:10 IST