Supreme Court Mumbai BMW hit-and-run Case: जुलै २०२४ मध्ये वरळीत मद्यधुंद अवस्थेत बीएमडब्लू गाडी चालवून दुचाकीला धडक दिल्यामुळे एका महिलेचा मृत्यू झाला होता. दुचाकीला धडक दिल्यानंतर आरोपी चालक मिहीर शाह घटनास्थळावरून पळून गेला होता. नोव्हेंबर २०२५ मध्ये उच्च न्यायालयाने आरोपीचा जामीन नाकारला होता. त्यानंतर आता सर्वोच्च न्यायालयानेही आरोपी मिहीर शाहाचा जामीन नाकारला आहे. अशा मुलांना धडा शिकवला पाहिजे, अशी टिप्पणी यावेळी सर्वोच्च न्यायालयाने व्यक्त केली.

मुंबई उच्च न्यायालयाने २१ नोव्हेंबर रोजी दिलेल्या निर्णयाला मिहीर शाहच्या वतीने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले होते. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश दीपंकर दत्ता आणि एजी मसीह यांच्या खंडपीठासमोर सदर प्रकरणाची सुनावणी झाली. यावेळी खंडपीठाने म्हटले की, पालक यासाठी जबाबदार आहेत. आम्ही आमच्या मुलांना योग्य प्रशिक्षण देऊ शकलो नाहीत.

एकनाथ शिंदेंच्या सेनेचाही उल्लेख

खंडपीठाने पुढे म्हटले, “आरोपी एका श्रीमंत कुटुंबातून येतो. त्याचे वडील राजेश शाह व्यावसायिक असून एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेचे माजी नेते आहेत. त्यांचा मुलगा काय करतो? तो रात्री उशीरा पार्टी करून येतो. त्याची मर्सिडीज गाडी शेडमध्ये पार्क करतो आणि बीएमडब्लू गाडी घेऊन बेदरकारपणे चालवून अपघातास कारणीभूत ठरतो. त्यानंतर तो पळून जातो. त्यामुळे तो आत असलेलाच बरा आहे.”

सर्वोच्च न्यायालयाने जामीन नाकारला

आरोपी मिहीर शाहाची बाजू वरिष्ठ वकील रेबेका जॉन यांनी मांडली. त्यांनी कबूल केले की, या प्रकरणातील तथ्ये थोडे अप्रिय आहेत. त्यांनी सर्वोच्च न्यायालयाला सांगितले की, प्रमुख साक्षीदारांची साक्ष नोंदविल्यानंतर उच्च न्यायालयाने जामीन मागण्यासाठी अर्ज करण्याची परवानगी दिली होती. यावर खंडपीठाने म्हटले की, अशा परिस्थितीत तुम्ही तुमची याचिका मागे घेऊ शकता. यानंतर जामिनासाठीची याचिका मागे घेण्यात आली.

कसा झाला होता अपघात?

जुलै २०२४ मध्ये मुंबईच्या वरळी सी फेस मार्गावर मिहीर शाह बीएमडब्लू वाहन बेदरकारपणे चालवत होता. यावेळी त्याने एका स्कुटरवरील जोडप्याला धडक दिली. यानंतर दुचाकीवर मागे बसलेल्या कावेरी नाखवा बीएमडब्लूच्या खाली आल्या. त्यांच्या पती प्रदीप नाखवा ओरडून गाडी थांबविण्याची विनंती केली. पण तरीही मिहीर शाहने तशीच गाडी पळवली. यामुळे कावेरी नाखवा काही अंतर गाडीसह फरफटत गेल्या. त्यांचा मृतदेह अपघातस्थळाहून पुढे दोन किमी अंतरावर आढळून आला होता.