मुंबई : आपले शिकणे सुरू असते तोवरच आपल्याला शिकवण्याचा अधिकार असतो. मी अजूनही शिकते आहे. ‘लोकसत्ता’ने समाजातील इतर कार्याबरोबरच कलेलाही प्राधान्य दिल्याने हा पुरस्कार मला विशेष वाटतो. ‘लोकसत्ता’ने माझ्यासह समाजातील दुर्गाना दिलेला पुरस्कार एखाद्या सर्वोच्च पुरस्काराइतकाच मानाचा आहे, अशा भावना ज्येष्ठ नृत्यांगना व नृत्यगुरू डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांनी गुरुवारी ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव’ पुरस्कार सोहळ्यात व्यक्त केल्या.

विविध क्षेत्रांत असामान्य कार्य करणाऱ्या नऊ दुर्गाचा गुरुवारी ‘लोकसत्ता दुर्गा पुरस्कार २०२१’ सोहळ्यात सन्मान करण्यात आला. त्यावेळी डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना जीवनगौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला.

शिवाजी पार्क येथील ‘स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारक’ येथे हा सोहळा झाला. कठीण परिस्थितीवर मात करून परित्यक्ता स्त्रियांसाठी कार्य करणाऱ्या अरुणा सबाने, प्लास्टिक कचऱ्यापासून इंधन बनवणाऱ्या डॉ. मेधा ताडपत्रीकर, रेशमाच्या किडय़ांपासून मिळणाऱ्या स्त्रवावर संशोधन करून त्याचा मानवावर उपचारांसाठी उपयोग करणाऱ्या डॉ. अनुया निसळ, रत्नांची पारख करणाऱ्या डॉ. जयश्री पंजीकर, ज्येष्ठ ओडिसी नृत्यांगना व वंचितांना नृत्यशिक्षणात सामावून घेणाऱ्या नृत्यगुरू झेलम परांजपे, लैंगिक अत्याचारपीडित व कचरावेचक व्यक्तींसाठी काम करणाऱ्या वृषाली मगदुम, गडचिरोलीत आदिवासी स्त्रियांचे संघटन उभे करणाऱ्या शुभदा देशमुख, दृष्टिहीनतेवर मात करून जर्मन भाषेत ‘पीएच.डी.’ मिळवणाऱ्या डॉ. उर्वी जंगम, ज्येष्ठ कबड्डी प्रशिक्षक शैलजा जैन या नऊ  दुर्गाना ‘लोकसत्ता दुर्गा’ पुरस्कार प्रदान करण्यात आला.

पुरस्कारप्राप्त नऊ  दुर्गाना ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी, सुप्रसिद्ध अभिनेत्री सुकन्या कुलकर्णी-मोने आणि ऊर्मिला मातोंडकर यांच्या उपस्थितीत गौरविण्यात आले. डॉ. सुचेता भिडे-चापेकर यांना यंदाच्या दुर्गाच्या हस्ते ‘लोकसत्ता दुर्गा जीवनगौरव पुरस्कार’ प्रदान करण्यात आला.

‘लोकसत्ता दुर्गा’ उपक्रमांतर्गत दरवर्षी नवरात्रीच्या निमित्ताने विविध क्षेत्रांत मोलाचे योगदान देणाऱ्या नऊ  कर्तृत्ववान स्त्रियांचा गौरव केला जातो. या पुरस्काराचे यंदाचे आठवे वर्ष होते. या पुरस्कार सोहळ्यात ज्येष्ठ साहित्यिका शान्ता शेळके यांच्या जन्मशताब्दीच्या निमित्ताने त्यांच्या कविता व गीतांचा शब्दोत्सवही साजरा झाला. शान्ताबाईंच्या कविता आणि नऊ दुर्गाचा सत्कार असा सुरेख संगम यानिमित्ताने उपस्थित रसिक प्रेक्षकांना अनुभवता आला.

गीत, कविता आणि निवेदनातून शान्ताबाईंच्या आठवणींना उजाळा देण्यात आला. तोच चंद्रमा नभात, ही वाट दूर जाते, रुपास भाळलो मी, ऋतू हिरवा-ऋतू बरवा, राजा सारंगा यांसारख्या शान्ताबाईंच्या अजरामर गीतांनी उपस्थितांना मंत्रमुग्ध केले. केतकी भावे-जोशी, सोनाली कर्णिक, मंदार आपटे या गायकांनी ही मैफल रंगवली. शान्ताबाईंच्या कवितांचे वैविध्य मांडत अभिनेत्री ऐश्वर्या नारकर, अनुश्री फडणीस, मधुरा वेलणकर यांनी काव्यवाचन केले. सांगीतिक मैफलीचे सूत्रसंचालन कुणाल रेगे, तर पुरस्कार सोहळ्याचे सूत्रसंचालन अभिनेत्री हेमांगी कवी यांनी केले.

नवरात्रीत दरदिवशी कोणती साडी नेसावी, इतकाच त्याचा मर्यादित अर्थ न घेता विविध क्षेत्रांत विधायक काम करणाऱ्या नऊ  स्त्रियांचा सन्मान केला तर नवरात्रीला खरा अर्थ प्राप्त होईल, या हेतूने या उपक्रमाची सुरूवात केल्याचे ‘लोकसत्ता’चे संपादक गिरीश कुबेर यांनी यावेळी स्पष्ट केले. स्त्रियांच्या आयुष्यातील आव्हाने, जीवनप्रवास, चौकटीबाहेरचे काम वाचकांसमोर आणण्याचे काम ‘लोकसत्ता’ सातत्याने करत आहे. प्रत्येक स्त्रीमध्ये एक दुर्गा असते, जी तिच्या क्षेत्रात अभूतपूर्व कार्य करत असते. त्याच कार्याचा सन्मान म्हणजे हा पुरस्कार आहे, असेही कुबेर म्हणाले.

वाचकांकडून आलेल्या नामांकनातून नवदुर्गाची निवड करण्यात आली. राज्याच्या पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्त्यां प्रीती पाटकर आणि कवयित्री-कथाकार नीरजा यांनी अंतिम परीक्षक म्हणून काम पाहिले.

‘‘लोकसत्ता नवदुर्गा’ पुरस्काराची परंपरा करोनाकाळातही सुरू ठेवता आली याचे समाधान वाटते. यंदा या पुरस्कारासाठी साडेचारशे नामांकने आली आणि मुदत संपल्यानंतरही नामांकने येत होती. करोना काळात सगळे उद्योग- व्यवसाय थांबले होते, मात्र स्त्रियांवरील अत्याचार याकाळात वाढले. मृत्यूचे भय असतानाही अनेक जणींनी आपापल्या क्षेत्रात लढा दिला. ज्यांना पुरस्कार मिळाला नाही त्यासुद्धा दुर्गाच आहेत’’, असे मत ‘लोकसत्ता’च्या फिचर एडिटर आरती कदम यांनी व्यक्त केले.

‘लोकसत्ता’च्या प्रकाशक वैदेही ठकार, ग्रॅव्हीटस् फाऊंडेशनच्या उषा काकडे, इंडियन ऑइल कॉर्पोरेशनचे डी. शिवप्रसाद, सनटेक रिअल्टी लिमिटेडचे अंकित शहा, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलायजर्स लि.चे पराग दांडेकर, बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि. च्या प्रिया राणे यांच्या उपस्थितीत पुरस्कार प्रदान करण्यात आले.

शालेय शिक्षणात कलेचा समावेश नसल्याची खंत

अन्न, वस्त्र, निवारा या मानवाच्या मूलभूत गरजा असल्या तरी कला हीसुद्धा एक महत्त्वाची गरज आहे. कला हीच माणसाला इतर प्राण्यांपासून वेगळे ठरवते. कला म्हणजे फक्त रंगमंचावर होणारे सादरीकरण नाही तर कला म्हणजे नीतिमूल्ये. काय करावे आणि काय करू नये, हे कला सांगते. मात्र, शालेय शिक्षणात कलेचा समावेश होत नाही, याची खंत वाटते. ‘लोकसत्ता’ने कलेचे महत्व जाणले याबद्दल मी आभार मानते. हा पुरस्कार स्वत:वरचा विश्वास वाढवणारा आहे. या उपक्रमातून अधिकाधिक कर्तृत्ववान स्त्रियांना प्रसिद्धी द्यावी, त्यातून इतरांना प्रेरणा मिळावी आणि हा उपक्रम असाच पुढे सुरू राहावा. – डॉ. सुचेता भिडे-चापेकर

’मुख्य प्रायोजक :

ग्रॅव्हीटस् फाऊंडेशन

सहप्रायोजक : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ, व्ही. पी. बेडेकर अँड सन्स प्रा. लि., सनटेक रिअल्टी लि., बुलडाणा अर्बन को-ऑप. क्रेडिट सोसायटी लि., बुलडाणा

पॉवर्ड बाय : प्रोग्रेसिव्ह एज्युकेशन सोसायटी, शिवाजीनगर, पुणे, राष्ट्रीय केमिकल्स अ‍ॅण्ड फर्टिलाइजर्स लि. इंडियन ऑइल कॉर्पोरेशन

टेलिव्हिजन पार्टनर : एबीपी माझा