नवी मुंबई पालिका निवडणुकीत रबाले येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर झोपडपट्टी वसाहतीतील प्रभाग क्रमांक १९ मधून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या पाठबळावर निवडून आलेले अपक्ष नगरसेवक सुधाकर संभाजी सोनावणे यांच्या गळ्यात महापौरपदाची माळ पडण्याची दाट शक्यता निर्माण झाली आहे. सोनावणे पती-पत्नी या निवडणुकीत निवडून आले असून यापूर्वी ते माध्यमिक शिक्षण मंडळाचे सभापती होते. राष्ट्रवादीत महापौर होण्यासाठी आणखी चार नगरसेवक बाशिंग बांधून तयार आहेत पण यात राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांचा निर्णय अंतिम राहणार आहे. महापौरपद राखीव झाल्यानंतर नाईक यांनी सोनावणे यांच्या नावाची घोषणा केली होती.
पालिका निवडणुकीत युती आणि राष्ट्रवादी यांच्यात झालेल्या चुरशीच्या लढाईत राष्ट्रवादीने आठजागा जास्त मिळवून युतीला मागे टाकले आहे. त्यामुळे पालिकेच्या सभागृहात युती ४३ व राष्ट्रवादी ५२ असे संख्याबळ आहे. युती काँग्रेस व पाच अपक्षांच्या मदतीने सत्ता स्थापन करण्याचा प्रयत्न करीत आहे पण राष्ट्रवादीने पाच अपक्षांना मतदानाच्या दिवशीच गळाला लावले आहे. त्यात सोनावणे दाम्पत्य राष्ट्रवादीच्या पाठिंब्यावर निवडून आल्याने त्यांना गृहीत धरण्यात आले आहे तर तीन अपक्षांना आमदार संदीप नाईक यांनी अज्ञातस्थळी रवाना केले आहे.  युतीने अपक्षांना चुचकारण्यास सुरुवात केल्याने राष्ट्रवादी पुरस्कृत अपक्षाला महापौर करण्याची खेळी नाईक यांनी रचली असल्याचे मानले जाते. या वेळचे महापौरपद अनुसूचित जातीसाठी राखीव असून खुल्या प्रभागातून निवडून आलेले सोनावणे हे त्या प्र्वगाचे नागरिक आहेत. सभागृहाची मुदत आठ मे रोजी संपत असल्याने नऊ मे रोजी महापौर, उपमहापौरपदांची निवडणूक होईल. सोनावणे यांच्या व्यतिरिक्त निवृत्ती जगताप, तनुजा मढवी, सुरेखा नरबागे, मुद्रिका गवळी, रमेश डोळे यांची नावे स्पर्धेत आहेत.

राष्ट्रवादीला सर्वाधिक मते
पालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला एकूण एक लाख ५१ हजार ५८२ मते पडली असून शिवसेना-भाजप युतीला एक लाख ३९ हजार ६२६ मते मिळाली आहेत. त्यामुळे लोकसभा विधानसभा निवडणुकीत ९० हजाराने वरचढ असणारी युती दुसऱ्या क्रमांकावर फेकली गेली आहे.

काँग्रेसचे आघाडीचे संकेत
काँग्रेस प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी आघाडीचे संकेत दिले आहेत. गणेश नाईक व चव्हाण यांच्यात शनिवारी होणाऱ्या बैठकीनंतर पालिकेत आघाडीवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे