भाजपा आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी एसटी कर्मचाऱ्यांच्या संपावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला आहे. तुम्ही शपथनामा कोणती हर्बल वनस्पती किंवा क्रुझ पार्टीत ड्रग्ज घेऊन लिहिला नाही, मग जे सांगितलं त्यावर कृती करणं महत्त्वाचं आहे, असं मत सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केलं. ते टीव्ही ९ मराठीशी बोलत होते.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

सुधीर मुनगंटीवार म्हणाले, “एसटी कामगारांनी ज्या मागण्या केल्या त्या तुम्ही आपल्या शपथनाम्यात हे निश्चित देऊ असं सांगितलं. एसटी कामगारांच्या संमेलनात जाऊन तुम्ही मोठी मोठी भाषणं केली. शरद पवार स्वतः आणि अनिल परब यांनीही एसटी कामगारांना राज्य व केंद्राच्या कर्मचाऱ्यांप्रमाणे वेतन देऊ असं सांगितलं. मग तुम्ही शपथनाम्यात जे लिहिता ते कोणती हर्बल वनस्पती घेऊन लिहिलं जात नाही. कोणत्या क्रुझ पार्टीत ड्रग्जचं सेवन करून लिहिलं जात नाही. मग अशा प्रसंगात जे तुम्ही सांगितलं त्यावर कृती करणं महत्त्वाचं आहे.”

हेही वाचा : “मुनगंटीवार यांचं LGBTQ समुहावरील वादग्रस्त वक्तव्य म्हणजे त्यांचं अज्ञान”, सामाजिक संघटनांचा हल्लाबोल

“संजय राऊत काय म्हणता यावर भाष्य करण्याची आवश्यकता नाही. संजय राऊत काय बोलतात हे सर्वांना माहिती आहे. डॉक्टरपेक्षा कंपाऊंडर बरा, हरामखोर या शब्दाचा अर्थ नॉटी आहे, पाप केल्याने करोना होतो अशी त्यांची वक्तव्य आहेत. त्यामुळे संजय राऊत काय बोलतात हे माध्यमांनीही गंभीरपणे घेऊ नये आणि मीही घेत नाही,” असं म्हणत मुनगंटीवार यांनी शिवसेना खासदार संजय राऊत यांना टोला लगावला.

“मन भरकटलं, की माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात”

दरम्यान, संजय राऊत यांनी भाजपा नेत्यांची मन:स्थिती चांगली नसल्याचं म्हणत टीका केली आहे. संजय राऊत यांना माध्यम प्रतिनिधींनी सुधीर मुनगंटीवार यांच्या विधानाविषयी विचारणा केली असता संजय राऊतांनी भाजपाला टोला लगावला. “शिवसेनेसोबतची युती आमची ऐतिहासिक चूक होती”, असं मुनगंटीवार म्हणाल्याचं सांगताच राऊत म्हणाले, “माणसाचं मन भरकटलं की अशी माणसं गांजा प्यायल्यासारखी बोलतात. राजकारणात विरोधीपक्ष ज्या पद्धतीने भरकटला आहे, ते पाहाता त्यांच्याकडून आपण कोणत्या वक्तव्याची अपेक्षा ठेवणार आहात?”, असा खोचक सवाल राऊतांनी विचारला.

“सुधीर मुनगंटीवार यांना मी अत्यंत संयमी, अभ्यासू नेते समजत होतो. त्यांची विधानसभेतली आणि बाहेरची भाषणं मी पाहातो. पण कुणी कुणाबरोबर जावं आणि कुणी कुणाबरोबर राहावं हा त्यांचा प्रश्न नसून महाराष्ट्रात तीन पक्षांनी काय करायचं ते ठरवलंय”, असं देखील राऊत म्हणाले.

“भाजपा नेत्यांची मनस्थिती ठीक नाही”

दरम्यान, भाजपा नेत्यांची मनस्थिती ठीक नसल्याचं संजय राऊत यावेळी उपहासाने म्हणाले. “कधी राष्ट्रवादीबरोबर तुम्हाला जावंसं वाटतंय. कधी शिवसेना हाच आमचा नैसर्गिक मित्र असल्याचं म्हणता. कधी अजून काय म्हणता. या महाराष्ट्रातल्या भाजपाच्या नेत्यांना शांतपणे केदारनाथला जाऊन महिनाभर बसण्याची गरज आहे. त्यांची डोकी थंड झाली, की त्यांनी पुन्हा महाराष्ट्रात येऊन राजकारण करावं. सध्या त्यांची मनस्थिती चांगली नाहीये. त्यांचं मनस्वास्थ्य ठीक व्हावं, म्हणून मी या नवीन वर्षात इश्वराकडे प्रार्थना करतो”, असं राऊत म्हणाले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar criticize sharad pawar and anil parab over st employee protest pbs
First published on: 01-01-2022 at 14:53 IST