अर्थखात्याच्या कारभाराचा मंत्र्यांकडून बाहेरूनकानोसा!

राजभवनावर एकदा मंत्रिपदाची शपथ घेतली की, लाल दिव्याच्या गाडीत बसून, धुरळा उडवतच मंत्रिमहोदय मंत्रालयात येतात. हा धुरळा सत्तेचा असतो. त्यामुळे सत्तापद असेपर्यंत मंत्र्याला धुरळ्याआड आपल्याच खात्यात काय चालले आहे ते दिसत नाही. ‘अभिनयसम्राट’ अतिनम्र कर्मचाऱ्यांचा, ‘पीएं’चा गराडा भोवती असतोच. त्यामुळे सारे काही आलबेल असावे, असा मंत्र्यांचा समज होतो. त्याला अपवाद ठरण्यासाठी अर्थ व नियोजनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी कंबर कसली आहे. सत्तेचा धुरळा आणि खुशमस्कऱ्यांच्या गराडय़ापलीकडे डोकावून ते आपल्यात खात्यातील कारभाराचा कानोसा घेत आहेत.

राज्याचा अर्थसंकल्प व वार्षिक आराखडा तयार करण्याची राज्याच्या आर्थिक प्रगतीला चालना देण्याची महत्त्वाची जबाबदारी वित्त व नियोजन खात्याकडे असते. मात्र या खात्याचा मंत्री होणे म्हणजे सर्व विभागांची नाराजी ओढवून घेण्यासारखे असते, असे म्हटले जाते. याच विभागामार्फत सर्व विभागांना व त्यांच्या योजनांना निधीचे वितरण केले जाते. कधीकधी कडक नियमांची फूटपट्टी लावून निधी दिला जातो, कधी त्यात कपात केली जाते, त्यामुळे सर्वच विभागांचा वित्त विभागावर छुपा रोष असतो. वित्त विभागातील अधिकाऱ्यांच्या वर्तनाबद्दलही अन्य विभागांच्या तक्रारी असतात. अशा सर्व परिस्थितीला तोंड देत, संयमाने हे खाते संभाळावे लागते. राज्यात राजकीय परिवर्तन झाल्यानंतर भाजपची सत्ता आल्यापासून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार हे अर्थमंत्री म्हणून वित्त व नियोजन विभागाची जबाबदारी संभाळत आहेत. वन खात्याचा कार्यभारही त्यांच्याकडे आहे. आतापर्यंत राज्याचे तीन अर्थसंकल्प त्यांनी सादर केले. आता त्यांनी आपल्याच खात्यातील कारभाराचा दुसऱ्या विभागांमार्फत आढावा घेण्याचा नवीन उपक्रम सुरू केला आहे. मुनगंटीवार यांनी अलीकडेच मंत्रालयातील सर्व विभागांच्या सचिवांना पत्रे पाठविली आहेत. त्यात त्यांनी आपल्या कार्यालयातील अधिकारी व कमचाऱ्यांची वर्तणूक, फायलींचा निपटारा व प्रतिसाद, विविध विषयांसदर्भात या कार्यालयाकडून केला जाणारा पाठपुरावा, बैठकांबाबतचे नियोजन, आपल्या विभागाशी समन्वय, कार्यालयातील कामकाजाबाबत आपले सर्वसाधारण मत व कामकाज सुधारण्यासंदर्भात आवश्यक असल्यास आपल्या सूचना, याबाबत त्यांनी अभिप्राय मागविले आहेत. वरील मुद्दय़ांना अनुसरून आपल्या कार्यालयातील कारभार सर्वसाधारण, चांगला, उत्कृष्ट, उत्युत्कृष्ट असे स्पष्ट व खुलेपणाने आपले मत मला कळावावे, असे आवाहन त्यांनी सचिवांना केले आहे. आपल्या खात्यातील कारभाराचा दुसऱ्या विभागांच्या मार्फत आढावा घेणारे सुधीर मुनगंटीवार हे पहिलेच मंत्री आहेत.