मुंबई: गुजरातसह देशातील विविध राज्यात लोकहित आणि विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या योजनांची लवकरच राज्यातही अंमलबजावणी करण्याची तयारी शिदे- फडणवीस सरकारने सुरू केली आहे. त्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या मंत्रिमंडळ उपसमितीने सोमवारी गुजरात सरकारच्या विकास प्रारूपाचा अभ्यास केला असून त्याची राज्यातही अंमलबजावणी करण्याचा प्रयत्न असल्याचे या समितीचे अध्यक्ष सुधीर मुनगंटीवार यांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

आजवर राज्यातील रोजगार हमी योजना, माहितीचा अधिकार, ग्रामस्वच्छता अभियान या योजनांची देशपातळीवर दखल घेण्यात आली. एवढेच नव्हे तर संपूर्ण देशात आजही या योजनांची अंमलबजावणी होत आहे. अनेक राज्यानी विकासासाठी नवीन योजना, तंत्रज्ञानाचा वापर करीत आपापल्या राज्यममध्ये विकासाचे नवीन मॉड़ेल विकसित केले आहे. राज्याच्या सर्वागिण विकासासाठी विविध राज्यातील नवनवीन योजना आणि कल्पनांची राज्यातही अंमलबजावणी करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. त्यासाठी शेजारील राज्यांचे विकासाच्या मॉडेलचा अभ्यास करण्यासाठी वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रिमंडळ उपसमिती गठीत करण्यात आली आहे. आज या समितीने गुजरातमधील विकासाच्या मॉडेलचा अभ्यास केला.

गुजरात सरकारने त्यांच्या महत्वाच्या योजना आणि प्रकल्प नियोजित वेळेत पूर्ण होण्यासाठी तसेच योजनांची प्रभावी अंमलबजावणी होण्यासाठी मुख्यमंत्री कार्यालयात डॅशबोर्ड विकसित केला आहे. तेथून राज्यातील प्रशासनावर लक्ष तर ठेवले जातेच शिवाय योजनांची देखरेख ठेवून त्यातील अडचणी दूर केल्या जातात. गुजरात सरकारने पाच कोटींपेक्षा अधिक खर्चाचे सर्व प्रकल्प आणि योजना या डॅशबोर्डशी संलग्न केल्या असून त्यामुळे संपूर्ण राज्यावर नियंत्रण ठेवण्यात मदत होते. तसेच प्रशासनावरही अंकूश ठेवता येतो. तेथे प्रकल्पांचे पंतप्रधान, मुख्यमंत्री आदी अतिमहत्वाच्या लोकप्रतिनिधींनी भूमिपूजन केलेले, मंत्र्यांनी भूमिपूजन केलेले आणि अन्य असे प्रकल्पांचे वर्गीकरण करम्ण्यात आले असून दररोज या प्रकल्पाच्या कामावर,प्रगतीवर लक्ष ठेवून त्यातील अडचणी दूर केल्या जातात. गुजरात सरकारचे हे मॉडेल खरोखरच उपयुक्त असून राज्यातही असा किंवा त्यापेक्षा अधिक चांगला डॅशबोर्ड करता येईल असे मुनगंटीवार यांनी सांगितले. अशाचप्रकारे अन्य राज्यातील योजनांचा अभ्यास करण्यात येणार असून त्याचा अहवाल नोव्हेंबर पर्यंत मंत्रिमंडळासमोर सादर करणार असल्याचे मुनगंटीवार यांनी सांगितले.

गुजरातचा सिंह महाराष्ट्रात तर राज्याचा वाघ गुजरातमध्ये गुजरातच्या जुनागढ येथील सक्करबाग उद्यानात असलेल्या नर आणि मादी सिंहांची जोडी (आशियटिक लॉयन ) मुंबईच्या संजय गांधी राष्ट्रीय उद्यानात आणण्यात येणार असून या बदल्यात या उद्यानातील वाघ (नर आणि मादी ) जुनागढ येथे पाठविण्यात येणार असल्याची माहितीही मुनगंटीवार यांनी दिली. याबाबतच्या प्रस्तावावर गुजरातचे राज्यमंत्री विश्वकर्मा यांच्यासोबत चर्चा झाली असून केंद्रीय प्राणिसंग्रहालय प्राधिकरणाकडून प्रस्तावास मान्यता मिळविण्यासाठी एकत्र प्रयत्न करण्याचे यावेळी ठरल्याचे त्यांनी सांगितले.

Mumbai News (मुंबई न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Sudhir mungantiwar uday samant on gujarat tour to study of development plan of gujarat govt zws
First published on: 27-09-2022 at 04:56 IST