मुंबई : नुकत्याच संपलेल्या गाळप हंगामात अंदाजापेक्षा कमी साखर उत्पादन झाले आहे. त्यामुळे साखर कारखान्यांकडील साठा कमी झाला आहे. दुसरीकडे मागणीतील सातत्यामुळे साखरेचे कारखान्यांवरील घाऊक विक्री दर ४१.८० रुपयांवर गेले आहेत, तर किरकोळ बाजारातील साखरेचे विक्री दर ४५ ते ५० रुपये किलोपर्यंत पोहचले आहेत.
केंद्र सरकारने जुलै महिन्यासाठी २२ लाख टनांचा कोटा जाहीर केला होता. जुलै महिन्यातील सण – उत्सव पाहता साखरेचा विक्री कोटा अपेक्षेपेक्षा कमी असल्यामुळे देशभरातील साखर बाजारात तेजीचे वातावरण निर्माण झाले आहे. त्याचा थेट परिणाम घाऊक बाजारावर झाला असून, साखरेच्या दरात प्रति क्विंटल सुमारे २०० रूपयांची वाढ झाली आहे. जून महिन्यात घाऊक बाजारात साखरेचे दर ४,१५० रुपये ते ४,१८० रुपये प्रति क्विंटलवर होते.
जुलैच्या सुरुवातीलाच हे दर ४,३५० रुपये ते ४,३८० रुपये प्रति क्विंटलवर पोहोचले आहेत. कमी उत्पादनामुळे अनेक साखर कारखान्यांकडे साखरेचा शिल्लक साठा अल्प राहिला असून, बाजारात नवीन पुरवठाही मर्यादित आहे. मागणीच्या तुलनेत उपलब्धता कमी होत असल्यामुळे बाजारात तेजी कायम राहण्याची शक्यता आहे, अशी माहिती दि पूना मर्चंट्स चेंबरचे सचिव ईश्वर नहार यांनी व्यक्त केली.
दरवाढ तात्पुरती, लवकरच दिलासा ?
जून महिना पूर्ण कोरडा गेल्यामुळे आगामी साखर हंगामाविषयी अस्थिरता वाढली होती. जुलैच्या सुरुवातीपासून चांगला पाऊस होत आहे. त्यामुळे आगामी साखर हंगामात अपेक्षित प्रमाणात उसाचा पुरवठा होईल. साखरेच्या दरातील तेजी फार काळ टिकून राहणार नाही. सध्या असलेला साखरेचा साठा नव्या हंगामातील साखर बाजारात येईपर्यंत पुरेल. साखरेचा तुटवडा नाही, साखर मुबलक प्रमाणात उपलब्ध आहे. जागतिक बाजारात साखरेचे दर कमी आहेत, त्यामुळे कोणताही कारखाना साखर निर्यात करीत नाही. त्यामुळे दरातील तेजी टिकून राहणार नाही, अशी माहिती कराडच्या कृष्णा सहकारी साखर कारखान्याचे व्यवस्थापकीय संचालक सूर्यकांत दळवी यांनी दिली.
