सुहास बिऱ्हाडे

आईवडील बाहेर गेले असल्याने १३ वर्षांची ती मुलगी घरात एकटीच होती. त्याच वेळी हातात सुरा घेऊन एका अज्ञात व्यक्तीने घरात प्रवेश केला. तो चोरीच्या उद्देशानेच आला होता. पण पुढे जे घडलं, त्यामुळे ती मुलगी तिचं कुटुंब पूर्णपणे उद्ध्वस्त झालं. काय होतं हे प्रकरण? त्याचा छडा कसा लागला?

मुंबई उपनगरात राहणारं एक मध्यवर्गीय कुटुंब. पतीपत्नी आणि दोन लहान मुले. मोठी मुलगी १३ वर्षांची. त्यांचं आयमुष्य साधं आणि सरळमार्गी होतं. पण एक अनामिक संकट त्यांच्यावर येऊ  घातलं होतं. इंधनदरवाढीविरोधात नुकताच सर्व विरोधी पक्षांनी भारत बंद पुकारला होता. शाळा सुरू होत्या पण आपल्या मुलांना पाठवावं की नाही असा विचार अनेक पालकांच्या मनात होता. या दाम्पत्याने असाच विचार केला आणि आपल्या १३ वर्षांमच्या मुलीला त्या दिवशी शाळेत पाठवले नाही. त्यामुळे ती घरीच थांबली. वडील कामावर निघून गेले. सारं काही आलबेल होतं. दुपारी आईला काहीतरी कामासाठी बाहेर जायचं होतं. तिने लहान मुलाला घेतलं आणि निघाली.

दुपारची वेळ होती. ती मुलगी टीव्ही पाहात होती. एवढय़ात दार वाजलं. ती दारात गेली तर एक अनोळखी इसम उभा होता. त्याला पाहूनच अंगावर कापरे भरावे असा भेसूर अवतार होता. त्याने थेट तिच्यावर प्रश्नांची सरबत्ती सुरू केली. वडील कुठे गेले? आई कुठे गेली? या अनोळखी आडदांड इसमाला पाहून ती गोंधळली होती आणि त्याला काही सांगण्याच्या आत तो अनोळखी इसम तिला ढकलत घरात शिरला. त्याने दार लोटत लपवून आणलेला चॉपर बाहेर काढला. त्या तळपत्या धारदार वस्तूला पाहून ती मुलगी घाबरली. त्या मुलीला गप्प राहण्याचा दम देत त्याने घरातील कपाटाचा ताबा घेतला. रोख रक्कम आणि सोनसाखळी लंपास केली. त्याचे काम फत्ते झालं होतं. काहीच कष्ट न करता त्याच्या हाती घबाड लागलं होतं. पण नंतर घरातील एकटय़ा मुलीला पाहून त्याच्या मनातला राक्षस जागा झाला.. मुलीने ओरडू नये म्हणून त्याने तिच्या तोंडात बोळा कोंबला होता. अध्र्या तासात त्याने तिच्यावर तीन वेळा अत्याचार केले आणि निघून गेला. जाताना मुलीचे हात-पाय बांधले आणि घराला बाहेरून कडी लावून तो पसार झाला.

काही वेळाने तिची आई परत आली. बेशुद्धावस्थेतल्या मुलीला तिने भानावर आणलं. पण मुलीच्या तोंडून घडला प्रकार ऐकल्यानंतर दु:खाने तिची शुद्ध हरपू लागली. त्याही अवस्थेत या दोघींनी बीकेसी पोलीस ठाणे गाठले. प्रकरण गंभीर होते. परिमंडळ ८चे पोलीस उपायुक्त अनिल कुंभारे यांच्या मार्गदर्शनाखाली ४ पथके तयार करून आरोपीचा शोध सुरू झाला.

मुलीच्या घराजवळ सीसीटीव्ही कॅमेरे नव्हते. त्यामुळे कसलाच पुरावा नसताना पोलिसांना त्या नराधमाचा शोध घ्यायचा होता. पोलिसांनी तिला विश्वासात घेतले आणि बोलते केले. तिने वर्णन सांगितले आणि त्या वर्णनावरून पोलिसांनी आरोपीची रेखाचित्रे तयार केली. ज्या अर्थी तो नराधम सराईतपणे तिच्या घरात शिरला होता, त्या अर्थी त्याला या परिसराची माहिती असावी असा कयास पोलिसांनी लावला. त्या दृष्टीने तपास सुरू केला. या परिसरातील अभिलेखावरील गुन्हेगारांची चौकशी करण्यात आली, पण त्यातून काहीच निष्पन्न झाले नाही.

पोलिसांनी खबऱ्यांचे जाळे सक्रिय केले. नाक्यानाक्यावर, बारमध्ये, वस्त्यांजवळ खबरी टेहळणी करू लागले. यातूनच एका खबऱ्याने पोलिसांना उपयुक्त माहिती दिली. कुख्यात गुंड शेरअली शेख उर्फ बाबा दहा दिवसांपूर्वीच तुरुंगातून सुटून आला होता. तरीही त्याच्या गळ्यातील सोनसाखळी, खिशात खुळखुळत असलेले पैसे संशयाला जागा देत होते. मुलीच्या वर्णनानुसार तयार करण्यात आलेले रेखाचित्रही बाबाशी मिळतेजुळते होते. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. काही वेळातच बाबाने आपल्या गुन्ह्य़ाची कबुली दिली.

बाबा हा सराईत गुंड आहे. तुरुंगातून सुटून आल्यावर तो पुन्हा चोरीसाठी फिरत होता. ही मुलगी ज्या घरात राहते त्या घरातून तिचे आई-वडील नसल्याचे त्याने हेरले. अशा वेळी चाकूचा धाक दाखवून घर लुटण्याची त्याची योजना होती. त्याला ती योजना जमली. पण नेमके त्याच वेळी ती मुलगी घरात एकटी असल्याने त्याने सैतानी डाव साधला. सध्या बाबाची रवानगी पोलीस कोठडीत करण्यात आली आहे. त्याच्यावर जबरी चोरी आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

काही वर्षांपूर्वी वांद्रे येथे असाच एक सराईत चोर एका इमारतीत चोरी करण्यासाठी शिरला. पाइपावरून चढून त्याने खिडकीतून घरात प्रवेश केला. तेव्हा घरात एक जर्मन तरुणी एकटी होती. त्या तरुणीला धाक दाखवून त्याने घरात चोरी तर केली आणि तिच्यावरही बलात्कार केला होता. घरात एकटय़ा राहणाऱ्या मुलींनी आणि त्यांच्या पालकांनी सुरक्षेसाठी अधिक दक्ष राहून सावधगिरी बाळगणे गरजेचे आहे.

@suhas_news

suhas.birhade@expressindia.com