नऊ वेळा ‘मि. इंडिया’ या किताबाला गवसणी घालणारा नावाजलेला शरीरसौष्ठवपटू सुहास खामकर याला पन्नास हजारांची लाच घेताना अटक करण्यात आली आहे.
रायगडच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडून पनवेलच्या तहसीलदार कार्यालयात सुहासला लाच घेतल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली.
पनवेल तालुक्यातील कोयनावेळें या गावातील जमीन विक्री प्रकरणाची सात बारावर नोंद करण्यासाठी खामकरने एक लाख रुपयांची मागणी केली होती. याशिवाय काही कागदपत्राची पुर्तता करून प्रस्ताव देण्याची सुचना तक्रारदाराकडे करण्यात आली होती. ३० जुलैला दिलेल्या प्रस्तावाची नोंद झाली का हे पाहण्यासाठी तक्रारदार तहसिल कार्यालयात गेले असता. खामकर यांनी त्यांना आपले सहाय्यक गणेश भोगाडे यांना भेटण्याची सुचना केली. गणेश भोगाडे यांनी तक्रारदाराकडून काम करून देण्यासाठी ६० हजार रुपयांची मागणी केली. तडजोडीनंतर ५० हजार रुपये देण्याचे तक्रारदारांनी मान्य केले होते. याबाबतची तक्रार मिळाल्यानंतर रायगडच्या लाचलुचपत विभागाने सापळा लावला होता.
सोमवारी दुपारी खामकर यानी आपले खासगी सहाय्यक गणेश भोगाडे यांच्या हस्ते लाचेची ५० हजार रुपयांची रक्कम स्विकारली. दरम्यान लाच मागितल्या प्रकरणी त्यांच्यावर लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलम ७,८, १३(१)ड आणि कलम १३(२) मधील तरतुदीनुसार गुन्हा दाखल करुन अटक करण्यात आली आहे. रायगड लाचलुचपत विभागाचे उप अधिक्षक सुनील कलगुटकर आणि महीला पोलीस निरीक्षक इनामदार यांच्या पथकाने हि कारवाई केली आहे. खामकर यांना मंगळवारी अलिबाग येथील विशेष न्यायालयासमोर हजर केले जाणार आहे.
सुहास खामकर याची शरीरसौष्ठवातील कारकीर्द
* नऊ वेळा मिस्टर इंडिया किताबाचा मान
* दोन वेळा मिस्टर आशिया किताबाचा विजेता
* सलग तीनवेळा महाराष्ट्र श्री किताब पटकावला
* राष्ट्रीय तसेच अंतरराष्ट्रीय शरीरसौष्ठव स्पर्धांमध्ये भारताचे प्रतिनिधीत्व
* दैदिप्यमान कामगिरी लक्षात घेऊन त्याला शिवछत्रपती पुरस्काराने सन्मानित
* क्रीडा क्षेत्रातील योगदान लक्षात घेऊन राज्यसरकारकडून नायब तहसिलदार पदावर नियुक्ती



