मुंबई : वरिष्ठ अधिकाऱ्याच्या जाचाला कंटाळून घाटकोपर पोलीस ठाण्यात कार्यरत असलेल्या एका सहाय्यक पोलीस निरीक्षकाने पोलीस ठाण्यातच आत्महत्याचा प्रयत्न केला. ही घटना सोमवारी रात्री घडली. या अधिकाऱ्यावर सध्या एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. गेल्या दीड वर्षांपासून घाटकोपर पोलीस ठाण्यात सहाय्यक पोलीस निरीक्षक पदावर कार्यरत असलेले बाळकृष्ण नानेकर यांची काही दिवसांपूर्वी पुणे येथे बदली झाली होती. त्यामुळे त्यांनी पुणे येथे कुटुंबियांसह राहण्याचा निर्णय घेतला. हेही वाचा >>> ‘मेट्रो २ ब’मधील मंडाले कारशेडचे ७० टक्के काम पूर्ण तशी तयारी त्यांनी केली होती. मात्र घाटकोपर पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना पुणे येथे जाण्याची परवानगी मिळत नव्हती. गेल्या काही दिवसांपासून वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून त्यांना वेगवेगळ्या प्रकारे त्रास देण्यात येत होता. त्यामुळे संतापलेल्या नानेकर यांनी सोमवारी रात्री पोलीस ठाण्यात असताना साफसफाई करण्याचे द्रव्य पिऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. कर्तव्यावर असलेल्या इतर सहकाऱ्यांनी तत्काळ त्यांना परिसरातील एका खासगी रुग्णालयात दाखल केले असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती पोलीस अधिकाऱ्यांनी दिली आहे.