मुंबई : भारतीय हवाई दलाच्या ‘सुखोई – ३० एमकेआय’ विमानांमध्ये संभाव्य तांत्रिक बिघाड होण्यापूर्वीच त्याचा अंदाज घेऊन आवश्यक उपाययोजना करण्यास आणि तांत्रिक देखभालीसाठी प्रगत डेटा-आधारित तंत्रज्ञान आयआयटी मुंबईने विकसित करण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे हवाईदलाची कार्यक्षमता आणि सज्जता अधिक मजबूत होण्यास मदत होणार आहे. तसेच हे संपूर्ण तंत्रज्ञान आयआयटी मुंबईने विकसित केलेल्या स्वदेशी ज्ञान आणि संशोधनावर आधारित असणार आहे.

सध्या लढाऊ विमानांची देखभाल ठरावीक वेळापत्रकानुसार केली जाते. काही वेळा विमानात प्रत्यक्ष बिघाड झाल्यानंतरच दुरुस्तीची प्रक्रिया सुरू करावी लागते. मात्र नव्या ‘डेटा ड्रिव्हन इंजिनीअरिंग’ प्रणालीमुळे विमानातील सेन्सर्स आणि डिजिटल माहितीच्या आधारे यंत्रणांची स्थिती सतत तपासता येणार आहे. त्यामुळे कोणता भाग कधी बदलण्याची आवश्यकता आहे, कोणत्या प्रणालीवर अतिरिक्त लक्ष द्यावे लागेल किंवा कोणती समस्या भविष्यात उद््भवू शकते, याचा अंदाज आधीच घेणे शक्य होणार आहे.

भारतीय हवाई दल आणि आयआयटी मुंबई संयुक्तरित्या ‘प्रेडिक्टिव्ह मेंटेनन्स’ आणि ‘प्रोग्नॉस्टिक अँड प्रेस्क्रिप्टिव्ह मेंटेनन्स’ ही आधुनिक तंत्रज्ञान प्रणाली विकसित करणार आहे. या प्रणालीच्या माध्यमातून विमानांच्या विविध यंत्रणांमधून मिळणाऱ्या तांत्रिक माहितीचे सातत्याने विश्लेषण करण्यात येणार आहे. या तंत्रज्ञानामुळे इंजिन, हायड्रॉलिक प्रणाली, इलेक्ट्रॉनिक उपकरणे किंवा इतर महत्त्वाच्या भागांमध्ये भविष्यात बिघाड होण्याच्या शक्यतेचा आधीच अंदाज घेता येणार आहे. त्यामुळे अनपेक्षित तांत्रिक अडचणी कमी होऊन विमानांची उपलब्धता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार आहे. या तंत्रज्ञानामुळे देखभाल प्रक्रियेतील वेळ, खर्च आणि मनुष्यबळाचा ताण कमी होण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्याचबरोबर लढाऊ विमानांची उड्डाणासाठीची उपलब्धता वाढल्याने हवाई दलाच्या ऑपरेशनल रेडिनेसमध्येही सुधारणा होणार आहे. संरक्षण क्षेत्रात कृत्रिम बुद्धिमत्ता, डेटा विश्लेषण आणि प्रगत अभियांत्रिकीचा वापर वाढविण्याच्या दिशेने हा महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.

पूर्णपणे स्वदेशी ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे प्रणाली विकसित

ही प्रणाली पूर्णपणे स्वदेशी ज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या आधारे विकसित केली जाणार असून त्यामध्ये आयआयटी बॉम्बेच्या संशोधकांची महत्त्वपूर्ण भूमिका असणार आहे. त्यामुळे ‘आत्मनिर्भर भारत’ उपक्रमाला बळ मिळण्यासोबतच भारतीय शैक्षणिक संस्थांची संरक्षण क्षेत्रासाठी अत्याधुनिक तंत्रज्ञान विकसित करण्याची क्षमता वाढणार आहे.

भारतीय हवाई दलाचे एअर मार्शल व महासंचालक (एअरक्राफ्ट) के. ए. ए. संजीब आणि आयआयटी मुबईचे संचालक प्रा. शिरीष केदारे यांच्या उपस्थितीत या संदर्भातील सहकार्याबाबत औपचारिक प्रारंभ करण्यात आला. भविष्यात भारतीय संरक्षण क्षेत्रात अशा प्रकारच्या कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा-आधारित प्रणालींचा वापर अधिक व्यापक पातळीवर वाढविण्याचा प्रयत्न केला जाणार आहे.

हवाई दलाची युद्धसज्जता वाढवण्याच्या दृष्टीने महत्त्व

पूर्णपणे स्वदेशी तंत्रज्ञानावर आधारित असलेला हा प्रकल्प भारतीय हवाई दलाची युद्धसज्जता आणि आत्मनिर्भरता वाढवण्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा असल्याचा विश्वास अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.