मुंबई : ठसकेबाज गायनाने ‘लावणी’ला प्रतिष्ठा आणि लोकप्रियता मिळवून देणाऱ्या लावणी सम्राज्ञी सुलोचना चव्हाण यांचे शनिवारी दुपारी १२ वाजता वृध्दापकाळाने निधन झाले. त्या ८९ वर्षांच्या होत्या. गिरगाव फणसवाडी येथील निवासस्थानी सुलोचना चव्हाण यांनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या पार्थिवावर मरिन लाईन्स येथील स्मशानभूमीत शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. त्यांच्या पश्चात मुलगा, सून आणि नातवंडे असा परिवार आहे.

अतिशय साधे-सोज्वळ व्यक्तिमत्त्व असलेल्या सुलोचना चव्हाण यांचे लावणी या संगीत प्रकाराशी आकस्मिक जुळलेले नाते अखेरपर्यंत अतूट राहिले. हिंदी चित्रपट संगीत क्षेत्रात पार्श्वगायनाची सुरुवात करणाऱ्या सुलोचना चव्हाण यांच्या आवाजाला तिथेही रसिकदाद मिळाली. अगदी लहानपणी ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटासाठी त्यांनी पहिले हिंदी गीत गायले होते.

thane, Shivsainik Viral message, Praises BJP MLA Sanjay Kelkar, Rajan Vichare, chaitra Navratri Festival, Sanjay Kelkar attennded Rajan Vichare Navratri, Rajan Vichare s Navratri Festival, thane navratri festival,
कडवट शिवसैनिक म्हणतो…, आनंद दिघेनंतर आमदार संजय केळकर करताहेत निस्वार्थपणे काम
shivraj patil chakurkar , shivajirao patil nilangekar
काँग्रेसच्या प्रचारातून चाकुरकर, निलंगेकराचे छायाचित्र गायब
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण
shashikant shinde
निष्ठा बदलली नाही म्हणून होणाऱ्या परिणामांना भीत नाही; शशिकांत शिंदे यांचा कणखर बाणा

चित्रपट संगीत गायनात रमलेल्या सुलोचना यांच्या आयुष्यात संगीतकार वसंतराव पवार यांनी केलेल्या आग्रहाखातर लावणीचा प्रवेश झाला. सुरुवातीला लावणी गायनासाठी त्या मनापासून तयार नव्हत्या. मात्र त्यांच्या आवाजात ‘नाव गाव कशाला पुसता मी आहे कोल्हापूरची..’ ही पहिली लावणी ध्वनीमुद्रित झाली आणि मग ‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’, ‘पाडाला पिकलाय आंबा’, ‘पदरावरती जरतारीचा’ अशा त्यांनी गायलेल्या अनेक बहारदार लावण्यांनी महाराष्ट्राला वेड लावले.

कलेच्या क्षेत्रातील भरीव योगदानाबद्दल सुलोचना चव्हाण यांना यंदा ‘पद्मश्री’ने सन्मानित करण्यात आले होते. चाकाच्या खुर्चीवर बसून त्यांनी हा सन्मान स्वीकारला. लावणी गायनाने मला प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. स्वत:चा आब, मर्यादा राखूनच मी लावणी गायनाचे हजारो कार्यक्रम केले, असे नम्रपणे त्यांनी सांगितले होते. महाराष्ट्रातील प्रत्येक गावखेडय़ात लावणी गायनाचा कार्यक्रम करू शकलो आणि या संगीत प्रकाराला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकलो अशी समाधानाची भावनाही सुलोचना यांनी अनेकदा व्यक्त केली होती.

गिरगवात जन्मलेल्या मूळच्या सुलोचना कदम यांचे शिक्षण चौथीपर्यंत झाले होते. त्यांच्या घरी त्यांचे मोठे बंधू दीनानाथ यांनी ‘श्रीकृष्ण बाळमेळा’ सुरू केला होता. या मेळय़ात काही भजने आणि गाणी गाणाऱ्या सुलोचना यांचा आवाज रंगभूषाकार दांडेकर यांनी ऐकला. त्यांनी संगीत दिग्दर्शक श्यामाबाबू पाठक यांच्याशी त्यांची भेट घडवून आणली आणि ‘कृष्ण सुदामा’ या चित्रपटातील गाण्याने त्यांच्या गायन कारकिर्दीचा प्रारंभ झाला.

शास्त्रीय संगीताचे कोणत्याही प्रकारचे शिक्षण नसताना, केवळ आवड म्हणून गाण्याकडे वळलेल्या सुलोचना यांनी वयाच्या अकराव्या वर्षांपासून पार्श्वगायनास सुरुवात केली. सी. रामचंद्र, मन्ना डे, मोहंमद रफी, मुकेश, जोहराबाई, आमीरबाई, शमशाद बेगम आणि त्या काळातील सर्व मान्यवर गायक-गायिकांबरोबर त्यांनी गायन केले. ‘चोरी चोरी’, ‘जो बिगड गयी वो किस्मत हूं’, ‘नजर से नजर लड गई’, ‘आँखो से मिली आँखे’, ‘आरमानोंकी दुनिया मे एक’, ‘रात अंधेरी मत कर देरी तु मेरा मै तेरी’, ‘अब तू ही बता तेरा दिल किसको पुकारे’ अशी हिंदी चित्रपटातील जवळपास अडीचशे गाणी त्यांनी गायली. गाण्यांचा ताल, लय समजून घेत त्यांचा अभ्यास करण्याचे त्यांचे कौशल्य स्तिमित करणारे होते. मराठी, हिंदीबरोबरच पंजाबी आणि गुजराती भाषेतही त्यांनी पार्श्वगायन केले.

लावणी गाण्यासाठी पती चित्रपट दिग्दर्शक श्यामराव चव्हाण यांनीच आपल्याला प्रोत्साहन दिले असे सुलोचना चव्हाण सांगत असत. संगीतकार वसंतराव पवार यांनी श्यामरावांकडे ‘रंगल्या रात्री अशा’ या चित्रपटातील ‘नाव, गाव कशाला पुसता’ ही लावणी सुलोचना यांच्याकडूनच गाऊन घ्यायची आहे असा आग्रह धरला होता. जगदीश खेबुडकरांनी लिहिलेली ही लावणी सुलोचना यांनी गायली आणि त्यांचे अवघे आयुष्यच लावणीमय होऊन गेले. ‘मल्हारी मरतड’, ‘केला इशारा जाता जाता’, ‘सवाल माझा ऐका’ अशा अनेक तमाशाप्रधान चित्रपटांतून त्यांनी आपल्या ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या.

लावणीतला ठसका, त्यातला श्रृंगार, खटय़ाळपणा त्यांनी आपल्या आवाजातून लोकांपर्यंत पुरेपूर पोहोचवला. त्यांच्या याच ठसकेबाज लावण्यांमुळे आचार्य अत्रे यांनी त्यांना ‘लावणी सम्राज्ञी’ हा किताब दिला. लावणी गायनाने त्यांना अनेक मान-सन्मान मिळवून दिले. ‘पी. सावळाराम-गंगा जमना’ पुरस्कार आणि संगीत क्षेत्रातील अत्यंत मानाच्या समजल्या जाणाऱ्या ‘गानसम्राज्ञी लता मंगेशकर’ पुरस्कारानेही त्यांना सन्मानित करण्यात आले होते. त्यांना संगीत नाटक अकादमीच्या पुरस्कारानेही गौरवण्यात आले होते. ‘माझे गाणे माझे जगणे’ हे त्यांचे आत्मचरित्रही प्रसिद्ध आहे.

कोणतेही संगीत हे कमी दर्जाचे नसते, प्रत्येक संगीत प्रकाराची स्वतंत्र ओळख आणि वैशिष्टय़े आहेत, असे त्या म्हणत असत. लावणी या संगीत प्रकाराची वैशिष्टय़े ओळखून ती आत्मसात करणाऱ्या आणि मनापासून लावणी महाराष्ट्रभर पोहोचवणाऱ्या सुलोचना चव्हाण या खऱ्या अर्थाने महाराष्ट्राची लावणी सम्राज्ञी होत्या.

गाजलेली गाणी

‘मला हो म्हणत्यात लवंगी मिरची’

‘कसं काय पाटील बरं हाय का?’

‘सोळावं वरीस धोक्याचं’

‘पदरावरती जरतारीचा मोर नाचरा हवा’

‘फड सांभाळ तुऱ्याला गं आला’

‘खेळताना रंग बाई होळीचा’

‘कळीदार कापूरी पान’

‘औंदा लगीन करायचं’

‘पाडाला पिकलाय आंबा’

लावणी गायनाने मला प्रसिद्धी आणि यश मिळवून दिले. आब, मर्यादा राखत मी लावणीला प्रतिष्ठा मिळवून देऊ शकले.

– सुलोचना चव्हाण

मुंबई : राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह अनेक मान्यवरांनी  लावणीसम्राज्ञी पद्मश्री सुलोचना चव्हाण यांच्या निधनाबद्दल तीव्र दु:ख व्यक्त केले. सुलोचना चव्हाण यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्याच्या सूचना एकनाथ शिंदे यांनी दिल्या. 

ठसकेबाज शब्दफेकीमुळे सुलोचनाताईंनी अनेक लावण्या व गीते अजरामर केली. त्यांचा स्वर वर्षांनुवर्षे लोकांच्या मनात घोळत राहील, यात शंका नाही.

– भगतसिंह कोश्यारी, राज्यपाल

लावणीला घराघरांत व मनामनात पोचविणारा आणि महाराष्ट्राच्या लावणीची ओळख सांगणारा आवाज शांत झाला आहे. महाराष्ट्राच्या संगीत क्षेत्रासाठी ज्येष्ठ गायिका सुलोचना चव्हाण यांचा आवाज एक मोठा ठेवा आहे.

– एकनाथ शिंदे, मुख्यमंत्री

 सुमारे पाच हजारांहून अधिक मराठी आणि अडीचशेहून अधिक हिंदीतील गीतांमधून त्यांनी रसिकांना मंत्रमुग्ध केले. मराठी कलाविश्व त्यांचे हे योगदान कधीही विसरू शकणार नाही. 

– देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री

बैठकीची लावणी किती समृद्ध असावी याचा वस्तुपाठ सुलोचनाताईंनी घालून दिला होता. अनेक तमाशाप्रधान चित्रपटातून त्यांनी ठसकेबाज स्वरात लावण्या सादर केल्या.

 – सुधीर मुनगंटीवार,

सांस्कृतिक कार्यमंत्री

सुलोचनाताईंनी लोककला व संस्कृती ही मूळ रंगात व ढंगात अस्सल बाजासह रसिकांसमोर सादर केली. महाराष्ट्राचे कलाविश्व समृद्ध करणाऱ्या सुलोचनाताई नवोदित कलावंतासाठी सदैव आदर्श व मार्गदर्शक राहतील.

अजित पवार, 

विरोधी पक्षनेते, विधानसभा

 बहारदार लावण्यांची मैफल आणि तडफदार आवाज आज हरपला.  त्या महाराष्ट्राच्या संगीत कोंदणातील हिरा होता.

 – उद्धव ठाकरे , पक्षप्रमुख, शिवसेना

सुलोचना चव्हाण यांनी गायलेल्या अनेक लावण्यांवर मी अदाकारी केली आहे. प्रेमळ आणि गुणी गायिका असेच मी त्यांचे वर्णन करेन.

 – लीला गांधी, ज्येष्ठ अभिनेत्री

 रंगमंचावरून लावणी

गायन करताना स्वत:चा आब राखणाऱ्या पहाडी आवाजाच्या सुलोचनाबाई प्रत्यक्षात किती सात्त्विक आणि सोज्वळ होत्या, हे मी वेगळे सांगण्याची आवश्यकता नाही. 

 – सुरेखा पुणेकर, लावणी कलाकार

महाराष्ट्राची आवडती लावणी सुलोचना चव्हाण यांनी आपल्या ठसकेबाज आवाजाने माजघरापर्यंत पोहोचविली.  त्यांच्या अनेक लावण्यांनी महाराष्ट्राला अक्षरश: वेड लावले. 

– डॉ. प्रकाश खांडगे,

लोककलांचे अभ्यासक

 लावणीचा ठसका, लय, नजाकत आणि लावण्य केवळ आवाजाच्या माध्यमातून रसिकांपर्यंत पोहोचवत त्यातील रांगडेपणा उभा करण्याचे सामथ्र्य सुलोचना चव्हाण यांच्या आवाजामध्ये होते.

– शाहीर सुरेशकुमार वैराळकर, सरचिटणीस, मराठी लोककला मंच