मुंबई : मध्य रेल्वेच्या मुंबई विभागात आणि पश्चिम रेल्वेच्या मुंबई सेंट्रल विभागात रविवारी विविध अभियांत्रिकी व देखभाल कामे करण्यासाठी मेगाब्लाॅक घेण्यात येणार आहे. मध्य रेल्वेच्या ब्लाॅकमुळे मशीद, सँडहर्स्ट रोड, चिंचपोकळी, करी रोड या स्थानकांतील लोकल थांबा रद्द करण्यात येणार आहे. त्यामुळे या स्थानकांतील प्रवाशांना पर्यायी मार्गाने इतर स्थानक गाठून इच्छित प्रवास करावा लागणार आहे. तर, पश्चिम रेल्वेच्या ब्लाॅकमुळे प्रवाशांच्या निश्चित लोकल सेवा रद्द असतील. या कारणास्तव प्रवाशांची प्रचंड धावपळ होण्याची चिन्हे आहेत.

मुख्य मार्ग

कुठे : सीएसएमटी – विद्याविहार अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.५५ ते दुपारी ३.५५ पर्यंत

परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.४८ ते दुपारी ३.४५ दरम्यान सुटणाऱ्या डाऊन धीम्या मार्गावरील लोकल सेवा सीएसएमटी – विद्याविहार स्थानकांदरम्यान डाऊन जलद मार्गावर वळवण्यात येतील. या लोकल भायखळा, परळ, दादर, माटुंगा, शीव आणि कुर्ला स्थानकांवर थांबतील आणि पुढे विद्याविहार स्थानकात डाऊन धीम्या मार्गावर वळवल्या जातील. घाटकोपरवरून सकाळी १०.१९ ते दुपारी ३.५२ दरम्यान सुटणाऱ्या अप धीम्या लोकल विद्याविहार – सीएसएमटी स्थानकांदरम्यान अप जलद मार्गावर वळवण्यात येतील आणि कुर्ला, शीव, माटुंगा, दादर, परळ आणि भायखळा स्थानकांदरम्यान थांबतील.

हार्बर मार्ग

कुठे : कुर्ला आणि वाशी स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन मार्गावर

कधी : सकाळी ११.१० ते दुपारी ४.१० पर्यंत

परिणाम : सीएसएमटीवरून सकाळी १०.३४ ते दुपारी ३.३६ दरम्यान वाशी / बेलापूर / पनवेलला जाणाऱ्या डाऊन लोकल आणि पनवेल / बेलापूर / वाशीहून सकाळी १०.१७ ते दुपारी ३.४७ दरम्यान सीएसएमटीकडे जाणाऱ्या अप लोकल रद्द करण्यात येणार आहेत. ब्लॉक काळात सीएसएमटी – कुर्ला – सीएसएमटी आणि पनवेल – वाशी – पनवेल विभागांवर विशेष लोकल सेवा चालवण्यात येतील. ब्लॉक कालावधीत ठाणे – वाशी / नेरूळ स्थानकांदरम्यान हार्बर मार्गावरील प्रवाशांना सकाळी १० ते सायंकाळी ६ पर्यंत प्रवास करण्याची परवानगी असेल.

पश्चिम रेल्वे

कुठे : चर्चगेट – मुंबई सेंट्रल स्थानकांदरम्यान अप आणि डाऊन धीम्या मार्गावर

कधी : सकाळी १०.३५ ते दुपारी ३.३५ पर्यंत

परिणाम : ब्लॉक कालावधीत धीम्या मार्गावरील सर्व लोकल चर्चगेट – मुंबई सेंट्रलदरम्यान जलद मार्गावर चालवण्यात येईल. ब्लॉक काळात काही अप आणि डाऊन लोकल रद्द करण्यात येतील. तसेच चर्चगेट येथे जाणाऱ्या काही लोकल वांद्रे / दादर स्थानकांदरम्यान अंशतः रद्द करण्यात येतील. या लोकल वांद्रे / दादर येथूनच डाऊन दिशेचा प्रवास करतील.