मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाने बुधवारी दोन नव्या निवडी जाहीर केल्या. राष्ट्रीय मुख्य प्रवक्तेपदी सोलापूर जिल्हाध्यक्ष उमेश पाटील यांची तर मुंबई अध्यक्षपदी आमदार झिशान सिद्दीकी यांची नियुक्ती पक्षाध्यक्ष सुनेत्रा पवार यांनी जाहीर केली आहे.

समीर भुजबळ यांनी मुंबई अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यापासून राष्ट्रवादीचे मुंबई अध्यक्षपद रिक्त होते. आमदार सिद्दीकी हे विधान परिषदेचे सदस्य आहेत. ते काँग्रेसमध्ये असताना वांद्रे पूर्वचे आमदारही होते. राष्ट्रवादी काँग्रेसकडे अल्पसंख्याक विभाग असून मुस्लीम समुदायाकडे पक्षाचे विशेष लक्ष आहे. मुंबईत राष्ट्रवादीच्या सना मलिक या एकमेव आमदार आहेत. तरुण नेता असलेल्या आमदार झिशान सिद्दीकी यांच्याकडे मुंबई अध्यक्षपद दिल्याने पक्ष संघटनेमध्ये उत्साह निर्माण होण्याची पक्षाला आशा आहे.

सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ येथील उमेश पाटील यांची पक्षाचे राष्ट्रीय प्रमुख प्रवक्ते म्हणून निवड करण्यात आली. पाटील यांनी १९९९ मध्ये कृषी विद्यार्थी परिषदेच्या माध्यमातून पक्षात कामास प्रारंभ केला. अडीच दशकांहून अधिक काळ ते पक्षात सक्रीय आहेत. सोलापूर जिल्हा परिषद सदस्य, युवक काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष, पक्षाचे प्रदेश सरचिटणीस, मुख्य प्रदेश प्रवक्ते अशी पाटील यांनी आजपर्यंत पक्षात पदे सांभाळली आहेत. पाटील हे पक्षाचे खासदार पार्थ अजित पवार यांच्या अत्यंत जवळचे मानले जातात.

Sunetra Pawar NCP President | Zeeshan Siddique NCP Mumbai President | Umesh Patil NCP Spokesperson | Brijmohan Srivastava NCP Objection
राष्ट्रवादीचे सोलापूर जिल्हा अध्यक्ष उमेश पाटील यांची राष्ट्रीय प्रमुख प्रवक्तेपदी बुधवारी निवड करण्यात आली.

निवडीवर आक्षेप का?:

राष्ट्रवादीचे राष्ट्रीय मुख्य प्रवक्ते बृजमोहन श्रीवास्तव (दिल्ली) यांनी उमेश पाटील यांच्या निवडीवर आक्षेप घेतला आहे. ३० नोव्हेंबर २०२३ रोजी दिवंगत पक्षाध्यक्ष अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये माझी राष्ट्रीय प्रवक्तेपदी प्रस्तावावर एकमताने निवड झाली होती. सुनेत्रा पवार यांची राष्ट्रीय पक्षाध्यक्ष पदाच्या निवडीची केंद्रीय निवडणूक आयोगाकडे वैधता अद्याप अनिर्णित आहे. त्यामुळे उमेश पाटील यांच्या राष्ट्रीय प्रमुख प्रवक्ते या पदाच्या निवडीला मान्यता दिली जाऊ शकत नाही. उमेश पाटील यांची निवड मागे घेण्यात यावी, असे आवाहन श्रीवास्तव यांनी पक्ष नेतृत्वाला केले आहे.