मुंबई : राज्याच्या नवीन उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार या पुढील मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी मंत्रालयात उपमुख्यमंत्रीपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. ३१ जानेवारी रोजी त्यांनी ‘लोकभवन’ येथे साधेपणाने उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली होती.
सुनेत्रा पवार या मंगळवारी बारामतीतून सकाळी मुंबईत येताच सिद्धिविनायक मंदिर व चैत्यभूमीवर येथे जाऊन दर्शन घेणार आहेत. त्यानंतर विमान अपघातात बळी पडलेल्या पिंकी माली यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांच्या कुटुंबियांचे सांत्वन करणार आहेत. त्यानंतर त्या मंत्रालयात येतील. मंत्रिमंडळाच्या बैठकीला त्या उपस्थित राहणार आहेत.
सुनेत्रा पवार यांच्याकडे अल्पसंख्याक विकास, क्रीडा, उत्पादन शुल्क ही अजित पवार यांच्याकडे असणारी तीन खाती सोपविण्यात आली आहेत. अर्थ खाते मात्र त्यांच्याकडे सोपविण्यात आलेले नाही. राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनानंतर अर्थ खात्याचा कारभार सोपवला जाण्याची शक्यता आहे. अजित पवार पुणे व बीड जिल्ह्याचे पालकमंत्री होते, या दोन्ही जिल्ह्याची पालकमंत्रीपदे सुनेत्रा पवार यांच्याकडे सोपवण्यात आली आहेत.
सुनेत्रा पवार यांनी शपथविधीनंतर राज्याचे पहिले मुख्यमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या समाधीचे कऱ्हाड येथे दर्शन घेतले. त्यानंतर त्या विमान अपघातामध्ये निधन झालेले अजित पवार यांचे अंगरक्षक विदिप जाधव यांच्या फलटण तालुक्यातील गावी जावून कुटुंबियांचे सात्वन केले. त्यानंतर त्यांचा मुक्काम बारामतीमध्येच आहे.
२८ जानेवारी रोजी अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये बारामतीत निधन झाले. त्यानंतर ३१ जानेवारी रोजी सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांचा शपथविधी अत्यंत घाईघाईत केल्याप्रकरणी उलटसुलट चर्चा झाली. पती व उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर १४ व्या दिवशी त्या उपमुख्यमंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारत आहेत.
अजित पवार यांचे कार्यालय मंत्रालयाच्या मुख्य इमारतीमधील सहाव्या मजल्यावर होते. ते अजित पवार यांचे दालन सुनेत्रा पवार यांना देण्यात आले आहे. सुनेत्रा पवार यांच्या नावाची पाटील त्यांच्या दालनाबाहेर मंगळवारी लावण्यात आली आहे. अजित पवार यांच्याकडे मंत्री आस्थापनेवर असलेले सर्व कर्मचारी सुनेत्रा पवार यांच्याकडे पूर्ववत कामकाज पाहणार आहेत.
पहिल्या महिला उपमुख्यमंत्री
१ मे १९६० ची महाराष्ट्राची स्थापना झाली. तेव्हापासून आजर्पंत २८ मुख्यमंत्र्यांनी शपथ घेतली आहे. मात्र यामध्ये एकही महिला उपमुख्यमंत्री नाही. सुनेत्रा पवार या राज्याच्या पहिला उपमुख्यमंत्री आहेत. मंगळवारी, १० फेब्रुवारी रोजी त्या मंत्रीपदाचा कार्यभार स्वीकारतील तसेच मंत्रीमंडळ बैठकीला उपस्थिती लावतील. त्या उपमुख्यमंत्री म्हणून पहिला निर्णय कोणता घेतात, याकडे राज्याचे लक्ष लागले आहे.

