मुंबई : मुलाच्या आमदारकीच्या बदल्यात राष्ट्रवादीचे (अजित पवार गट) प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मुलीच्या रायगडच्या पालकमंत्रीपदावर पाणी सोडले आहे. दुसरीकडे, नाशिकचे पालकमंत्रीपद गिरीश महाजन यांच्याकडे कायम ठेवण्यात आले.
नाशिकच्या पालकमंत्रीपदी भाजपचे गिरीश महाजन तर रायगड पालकमंत्रीपदी शिवसेनेचे (शिंदे गट) भरत गोगावले यांच्या नियुक्तीचा शासकीय आदेश जारी करण्यात आला. सुमारे दीड वर्षांचा वादानंतर या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा अखेर सुटला आहे. जानेवारी २०२५ मध्ये सर्व पालकमंत्र्यांची यादी जाहीर करण्यात आली होती. नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन तर रायगडच्या पालकमंत्रीपदी आदिती तटकरे यांचा यात समावेश होता. पण उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्लीतील भाजप नेतृत्वाकडे केलेल्या तक्रारीनंतर अवघ्या २४ तासांत या दोन जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदांच्या नियुक्तीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना स्थगिती द्यावी लागली होती. तेव्हापासून या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा वाद सुरू होता.
रायगडमध्ये तटकरे आपल्या मुलीलाच पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे म्हणून आग्रही होते. शिवसेनेचे आमदार गोगावले यांना पालकमंत्रीपद मिळाले पाहिजे यावर अडून बसले होते. राष्ट्रवादी व शिवसेना आपल्या भूमिकेवर ठाम राहिल्याने या दोन्ही जिल्ह्यांच्या पालकमंत्रीपदाचा तिढा कायम होता. विधान परिषदेच्या रायगड-रत्नागिरी-सिंधुदुर्ग स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत तटकरे यांनी मुलाच्या आमदारकीसाठी सारी प्रतिष्ठा पणाला लावली होती. या मतदारसंघात नगरसेवक शिंदे गटाचे अधिक होते. यामुळे शिंदे गटाने ही निवडणूक लढविण्याची तयारी केली होती. शेवटी शिंदे गटाने तटकरे यांच्या मुलाला पाठिंबा देण्याच्या बदल्यात रायगडच्या पालकमंत्री पदावर दावा केला होता. मुलासाठी तटकरे यांनी मुलीच्या पालकमंत्रीपदावर समझोता केला. परिणामी आदिती तटकरे यांच्याकडील रायगडचे पालकमंत्री पद गेले आहे.
नाशिकमध्ये राष्ट्रवादीचे सर्वाधिक सात आमदार आहेत. त्यामुळे राष्ट्रवादीला पालकमंत्रीपद मिळावे, अशी तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांची भूमिका होती. तेव्हा माणिकराव कोकाटे आणि नरहरी झिरवाळ असे राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोन मंत्री होते. नाशिकमध्ये पुढील वर्षी सिंहस्थ कुंभमेळा आहे. कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर पालकमंत्रीपद भाजपकडेच कायम राहिल, असे मुख्यमंत्र्यांनी दोन्ही पक्षांच्या नेत्यांकडे स्पष्ट केले होते. भाजपला नाशिकचे पालकमंत्री सोडायचे नव्हते. माणिकराव कोकाटे यांचा मंत्रीपदाचा राजीनामा झाला. छगन भुजबळ यांचा मंत्रीमंडळात उशिराने प्रवेश झाला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष अजित पवार यांचे विमान अपघातामध्ये निधन झाले. मध्यंतरी नाशिकमध्ये पालकमंत्रीपद भुजबळांना द्यावे, असे फलकही झळकले होते. कुंभमेळा लक्षात घेता गिरीश महाजन यांच्याकडेच पालकमंत्रीपद कायम ठेवण्यात आले आहे.
समोपचाराने निर्णय :
माझ्या मुलाच्या विधान परिषदेच्या आमदारकीसाठी पक्षाने रायगडचे पालकमंत्रीपद सोडले असे नाही. रायगड व नाशिकच्या पालकमंत्रीपदाचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी एकत्र बसून सामोपचाराने घेतला आहे. हे तीन पक्षाचे आघाडी सरकार आहे. आघाडी धर्माचे पालन करण्यासाठी दोन पावले मागे यावे लागते.- खासदार सुनील तटकरे, प्रदेशाध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार
राष्ट्रवादीचा दावा होता :
नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक सात आमदार राष्ट्रवादी काँग्रेसचे आहेत. त्यामुळे शिवसेनेकडे पालकमंत्रीपद देण्यास पक्षाचा विरोध होता. पालकमंत्री नियुक्तीचा अधिकार मुख्यमंत्र्यांचा असतो. राष्ट्रवादीशी नेतृत्वाशी चर्चा करुनच पालकमंत्रीपदाचा निर्णय झाला असेल.- माणिकराव कोकाटे, माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेस, नाशिक
