मुंबई : मंबईकडे राष्ट्रवादीच्या स्थापनेपासूनच नेतृत्वाचे दुर्लक्ष झाले. मुंबईवर शिवसेना, काँग्रेसचा पगडा होता. परिणामी राष्ट्रवादीला स्वत:चे स्थान निर्माण करता आले नाही. यातूनच मुंबईत पक्ष वाढला नाही, अशी कबुली राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार) प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी दिली.
छगन भुजबळ त्यावेळी काँग्रेसचे मुंबईतले मोठे नेतृत्व होते. २००४ च्या निवडणुकीत भुजबळांनी नाशिक जिल्ह्यातील येवला मतदारसंघ निवडला. परिणामी, राष्ट्रवादी काँग्रेसला मुंबईत ताकदीचा नेता मिळाला नाही. अन्यथा मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेस ताकदीने उभा राहिला असता, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेसचे तटकरे यांनी बुधवारी ‘लोकसत्ता लोकसंवाद’ कार्यक्रमात केला.
राष्ट्रवादीला मुंबई महापालिका निवडणुकीत १० जागांच्या आतला पक्ष म्हणून हिणवले जाते. यावर तटकरे म्हणाले, खरे आहे. पक्षाला नेतृत्वच लाभले नाही. जयंत पाटील १० वर्षे मुंबईचे पालकमंत्री होते. सचिन अहिर, नवाब मलिक, राखी जाधव, धनंजय पिसाळ यांच्या हाती नेतृत्व दिले. मात्र दुर्दैवाने पक्षाला म्हणावी तितकी उभारी मिळाली नाही. त्या दरम्यान भाजप आणि शिवसेनेची युती झाली. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हाती शिवसेनेचे नेतृत्व होते. त्याचा फटका राष्ट्रवादीबरोबरच काँग्रेसलाही बसला.
मुंबईचा महापौर हिंदू-मराठी होईल, या भाजपच्या धाेरणात वावगे काही नाही. पूर्वी शिवसेनेने अनेकदा या मुद्यावर निवडणुका लढवल्या आहेत. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे राजकारण परप्रांतीयांच्या विरोधात राहिलेले आहे. त्यामुळे आता भाजपला दोष देता येणार नाही, असे तटकरे म्हणाले. यावेळी आम्ही मुंबईत चांगले यश मिळवू. महायुतीला स्थिती चांगली आहे. समीकरणे बदलली आहेत. पक्षाने पूर्ण ताकत लावली आहे. भाजपविरुद्ध आम्ही लढत असलो तरी कटुता येणार नाही. निवडणुका संपल्या की कटुता संपेल, असा दावा तटकरे यांनी केला.
मतविभाजन हा उद्देश नाही :
मुंबईत राष्ट्रवादीने २३ मुस्लिमांना उमेदवारी दिली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर उमेदवारी ही अल्पसंख्याक मतांच्या विभाजनासाठी असल्याचा आरोप होत आहे याकडे लक्ष वेधले असता तटकरे म्हणाले, हा आरोप पूर्णता चुकीचा आहे. मुंबईत विधानसभेला आमच्या वाट्याला तीन जागा आल्या होत्या. तिन्ही जागांवर मुस्लीम समाजाचे उमेदवार रिंगणात होते. मुस्लीम समाजात पक्षाचे चांगले काम आहे. यामुळेच ९२ पैकी २३ मुस्लिमांना उमेदवारी देण्यात आल्याचे सुनिल तटकरे यांनी सांगितले.
