मुंबई : नामवंत राजकीय रणनीतिकार प्रशांत किशोर राष्ट्रवादीसाठी (अजित पवार) काम करतात हे मला माहिती नाही, त्यांना राजकीय सल्लागार नेमल्याची माझ्याकडे माहिती नाही. त्यांची पक्षाने सल्लागार म्हणून नियुक्ती केली असती तर मला त्याची नक्कीच माहिती असती. प्रदेशाध्यक्षपदावरुन मला हटवण्याचा प्रशांत किशोर यांनी सल्ला दिला असेल ,असे वाटत नाही. राजकीय सल्लागारावर अवलंबून निर्णय घेण्यापेक्षा जनतेत मिस्ळल्याने राजकीय यश प्राप्त होते, यावर आपला विश्वास आहे, अशी भूमिका राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांनी मांडली.

प्रशांत किशोर यांच्याशी शुक्रवारी राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार आणि खासदार पार्थ पवार यांची बैठक झाली. त्या बैठकीत प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्याविषयी किशोर यांनी नाराजी व्यक्त केल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले होते. तटकरे यांनी आज पत्रकार परिषद घेतली आणि या बातम्या निराधार असल्याचे म्हटले. भाजप अध्यक्ष नितीन नबीन यांच्या मतदारसंघात भाजप उमेदवाराचा पराभव करून किशोर हे बिहार विधानसभेत अलीकडेच निवडून आले आहेत. यामुळेच प्रशांत किशोर यांनी सुनेत्रा पवार व पार्थ यांची भेट घेणे भाजपला फारसे रुचलेले नाही. यातूनच तटकरे यांनी प्रशांत किशोर यांच्या विरोधात वक्तव्य केल्याचे मानले जाते.

मी १९८४ पासून राजकारणात आहे. पण, मला कधी सल्लागाराची गरज वाटली नाही. अजित पवार आणि आम्ही आजपर्यंत तब्बल आठवेळा महाराष्ट्र पिंजून काढला. त्यामुळेच पक्षाच्या आमदारांची संख्या ४१ वर पोचली. प्रशांत किशोर यांच्या पक्षनेतृत्वाबरोबर यापूर्वी बैठका झाल्या होत्या. मी त्या बैठकांना हजर होतो. प्रशांत किशोर यांची सुनेत्रा पवार यांच्याशी झालेली कालची भेट औपचारिक होती, असे मला सांगण्यात आले. राष्ट्रवादी आज भाजपच्या राष्ट्रीय लोकशाही आघाडीत आहेत. प्रशांत किशोर हे भाजप उमेदवाराचा पराभव करुन बांकीपूरमधून निवडून आलेले आहेत, असे तटकरे म्हणाले.

मी व्यवहारीक राजकारणी आहे. मी आठ निवडणुका लढतो. मी मतदारसंघाचे कधी सर्वेक्षण केले नाही. सिद्धांतावर आपला विश्वास नाही. मी मैदानावरचा कार्यकर्ता आहे. नेतृत्वाने मतदारांना गृहीत धरायला नको. यावरच १९९९ पासून राष्ट्रवादीची आजपर्यंतची वाटचाल झालेली आहे. पक्षात कोणतेही गटतट नाहीत. आमच्यामध्ये संवाद नाही, या बातम्या निराधार आहेत. सध्या होत असलेल्या नव्या नियुक्त्या माझ्या सहीने झालेल्या आहेत, असे तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेसच्या विलीनीकरणाबाबत पुण्यातील संजय काकडे य यांनी शरद पवार यांच्यावर केलेली टीका चुकीची होती. अजित पवार यांच्यासोबत आम्ही पक्षात वेगळा निर्णय घेतेवेळी निर्णय केला होता की, शरद पवार यांच्यावर टीका करायची नाही. त्यामुळे काकडे यांच्यासह सर्वांना त्यासदंर्भात समज दिली जाईल, असे सुनील तटकरे म्हणाले.