सुनील तटकरे यांचा शिवसेनेला टोला

महानगरपालिका निवडणूक प्रचारात मंत्र्यांचे राजीनामे खिशात असल्याचे सांगण्यात येत होते. पण या राजीनामा पत्रावरील शाई सुकून गेली असेल व एव्हाना हे राजीनामे खिशात फाटले असतील, असा  टोला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी शिवसेनेवर लगावला.

शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याची शक्यता अजिबात वाटत नाही, असेही मत तटकरे यांनी व्यक्त केले. पुढील आठवडय़ात सुरू होणाऱ्या  विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांच्या वतीने अविश्वासाचा ठराव मांडण्यात येणार का, या प्रश्नावर शिवसेनेने विरोधी मतदान करण्याची भूमिका घेतली तरच तो मंजूर होऊ शकतो. शिवसेना तशी भूमिका घेण्याबाबतही त्यांनी साशंकता व्यक्त केली. जिल्हा परिषदांमध्ये सत्तेसाठी काँग्रेसबरोबर आघाडीची चर्चा सध्या सुरू आहे. काँग्रेस नेत्यांनी अनुकूल भूमिका घेतल्याने आघाडीचा मार्ग मोकळा होऊ शकतो. मात्र काही ठिकाणी शिवसेना आणि काँग्रेसमध्ये उघडपणे आघाडी झाल्याचे तटकरे यांनी सांगितले.