मुंबई-पुण्यासारख्या मोठ्या शहरात आपलं एक स्वत:चं घर असावं हे अनेकांचं स्वप्न असतं. कामाच्या निमित्ताने या शहरांमध्ये स्थिरावल्यावर तर अधिकच ही निकड भासू लागते. अर्थात, शहरात अर्थार्जनाच्या संधी अधिक असल्या तरी प्रत्येकाकडे इथे येऊन घर घेण्याचं वेगवेगळं कारण असू शकतं. अशाच भिन्न हेतूने आलेल्या, भिन्न जीवनशैली असलेल्या, वेगवेगळ्या वातावरणात वाढलेल्या दोन कुटुंबांतील सदस्य दुर्दैवाने एकाच घरात अडकतात, तेव्हा काय काय होऊ शकतं, याची थोडी खरी आणि थोडी फिल्मी शैलीत सांगितलेली कथा समीर आशा पाटील दिग्दर्शित ‘सुपर डुपर’ चित्रपटात पाहायला मिळते. ‘सुपर डुपर’चा कथाविषय फार रंजक आहे. आजच्या काळात जिथे फसवणुकीच्या नानाविध प्रकारच्या घटनांचं पीक आलेलं आहे, तिथे एकच घर दोन वेगवेगळ्या कुटुंबांना विकलं गेल्याने होणाऱ्या करामतीची ही गोष्ट नाही म्हटलं तरी दखल घ्यायला लावते. रोहित आणि ईशा हे लिव्ह इनमध्ये राहणारं जोडपं. दोघांचाही आपापल्या क्षेत्रात पुढे जाण्यासाठी संघर्ष सुरू आहे. लिव्ह इनमध्ये राहात असल्याने साहजिकच जवळचे नातेवाईक नाहीत, जो काही आधार आहे तो मित्र-मैत्रिणींचा. बाकी दिवसभर रोजची काम मिळवण्यासाठीची धडपड आणि रात्री दणकून मित्र-मैत्रिणींबरोबर पार्टी जमवत हर फिक्र को धुँए मे उडाता चला गया… हा शिरस्ता त्यांच्या अंगवळणी पडला आहे. मात्र, त्यांचं लिव्ह इनमध्ये राहणं, पार्ट्या करणं, दारू पिऊन होणारा धिंगाणा यावरून दरवेळी सोसायट्यांमध्ये होणारी भांडणं आणि घर सोडावं लागणं या प्रकाराला कंटाळून दोघंही स्वत:चं घर घ्यायचं ठरवतात. तर दुसरीकडे दुष्काळाचा फटका बसल्यामुळे रातोरात जमीनजुमला विकून शहरात घर घेऊन स्थायिक होण्याच्या उद्देशाने आलेलं भलंमोठं जाधव कुटुंब. आई-वडील, दोन भाऊ, त्यांच्या बायका, मोठ्या भावाची मुलं आणि दोन शेळ्या असा त्यांचा मोठा पसारा आहे. या दोन्ही कुटुंबांची एजंटकडून फसगत होते आणि कायदेशीर न्यायालयीन प्रक्रियेतून निर्णय होईपर्यंत एकाच घरात राहण्याची वेळ त्यांच्यावर येते. त्यांच्या एकत्र येण्यातून घडणाऱ्या गंमतीजमती, दोन्हीकडचा वैयक्तिक संघर्ष, अडचणी आणि एकमेकांबरोबरच्या राहण्यातून सापडत गेलेले सूर असा रंजक प्रवास या चित्रपटात पाहायला मिळतो.

चित्रपटाच्या कथाविषयानुसार त्याची मांडणी करतानाच दोन वेगळ्या पद्धतीने जगणाऱ्या कुटुंबाचा विचार लेखक-दिग्दर्शक समीर आशा पाटील यांंनी केला आहे. त्यातही एक अगदी तरुण जोडपं आहे, तर दुसऱ्या कुटुंबात जाणत्यापासून ते लहानग्यांपर्यंत सगळेच आहेत. त्यामुळे त्यांचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन आपसूकच कथेत येतो. एकीकडे स्वतंत्र विचाराने वागणारे, मुक्तपणाने जगणारे रोहित आणि ईशा, तर दुसरीकडे छोट्या-मोठ्या कुरबुरी असल्या तरी एकमेकांना सांभाळून घेणारे, एकमेकांच्या सल्ल्याने वागणारे जाधव कुटुंबातले सदस्य आहेत. दोन टोकाची जीवनशैली असणारी माणसं इच्छा नसताना एकमेकांच्या सान्निध्यात राहायला लागली तर आधी भांडणं, मग हळूहळू ओळख, आपल्याला काय त्यांचं? हा विचार, आपल्यापेक्षा ते कसे सुखी आहेत या तुलनात्मक विचारातून दिली जाणारी वागणूक या सगळ्यातून ते खऱ्या अर्थाने मनापासून एकत्र कसे येतात, हे दाखवताना वास्तव परिस्थिती आणि त्याला बऱ्यापैकी फिल्मी रंजक मांडणीचा तडका अशा पद्धतीने चित्रपटाची मांडणी केली असल्याने कुठेही चित्रपट कंटाळवाणा वाटत नाही.

चित्रपटातल्या कलाकारांनी त्यात खऱ्या अर्थाने गंमत आणली आहे. रोहित आणि ईशाच्या भूमिकेत अभिनेता ललित प्रभाकर आणि अभिनेत्री विदुला चौगुले ही जोडी एकदम चपखल बसली आहे. आधुनिक पद्धतीचं वागणं-बोलणं, त्यांचे विचार, कपडे आणि एकंदरीतच वावर सगळ्याच बाबतीत ते दोघंही अगदी सहजतेने वावरले आहेत. तीच बाब कुटुंब प्रमुख म्हणून घरावर आलेलं संकट हिमतीने परतवून लावण्यासाठी प्रयत्न करणाऱ्या आई-वडिलांची भूमिका निर्मिती सावंत आणि शशांक शेंडे यांनी सहज आश्वासक पद्धतीने रंगवली आहे. हृषीकेश जोशी, कुशल बद्रिके, नम्रता संभेराव आणि प्रतीक्षा कोते यांनी या कुटुंबाचे चार तरुण चौकोन म्हणून अधिक मजा आणली आहे. चित्रपटातले काही प्रसंग खूप छान जमून आले आहेत. हृषीकेश जोशी आणि ललित प्रभाकर यांच्यातली नोकझोक, शशांक शेंडे आणि हृषीकेश जोशी हा बापलेकांमधला हृद्य संवाद, शशांक शेंडे यांच्यावर चित्रित झालेलं अंगाई गीत हीसुद्धा सुरेख जमून आलेली गोष्ट आहे. बाकी फिल्मी गोष्टींची रेलचेलही तितकीच आहे. मुळात ज्या विषयावर कथा बेतली आहे तो विषय नावापुरता येतो. म्हणजे घराचा प्रश्न फार सहज निकाली निघाला आहे. त्यातून जे उत्तर या कुटुंबाच्या वाट्याला आलं आहे त्याचा स्वीकार आणि कुटुंब म्हणून एकमेकांचा स्वीकार ही तशी आदर्शवत वाटणारी गोष्ट. तिथपर्यंत पोहोचण्यासाठीचा प्रसंग, सासू-सुनांमधला प्रसंग, ललितचं टॉवेलदृश्य असे काही प्रसंग हे नेहमीच्या ठोकताळ्यांचा आधार घेत रंगवलेले आणि बरेचसे फिल्मी आहेत. चित्रपटातलं घर हा मुख्य विषय असला तरी त्याचा प्रभाव तितकासा पडलेला नाही. अर्थात, या उणिवा कलाकारांच्या कमाल अभिनयाने भरून काढल्या आहेत. त्यामुळे कुटुंबाची, नात्यांची गोष्ट सांगणारा मनोरंजक चित्रपट म्हणून ‘सुपरडुपर’ची धमाल अनुभवायला हवी.

Award Banner

सुपरडुपर दिग्दर्शक – समीर आशा पाटील

कलाकार – निर्मिती सावंत, शशांक शेंडे, ललित प्रभाकर, विदुला चौगुले, हृषीकेश जोशी, कुशल बद्रिके, नम्रता संभेराव, प्रतीक्षा कोते, जागृती दातीर.