मुंबईकरांचे आरोग्य जपण्यासाठी महापालिकेने गेल्या चार वर्षांत केलेल्या ठोस उपाययोजनांमुळे मुंबईकरांना व्यापक वैद्यकीय सुविधा उपलब्ध झाल्या असून आगामी पालिका अर्थसंकल्पात भांडुप येथे ५५० खाटांच्या सुपरस्पेशालिटी रुग्णालयाची उभारणी करण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे पूर्व उपनगरातील वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन पालिका रुग्णालयात एक हजार बेड वाढविण्यात येणार आहेत.
गेल्या चार वर्षांतील पालिका अर्थसंकल्पाचा विचार केल्यास आरोग्य अर्थसंकल्पात एक हजार कोटी रुपयांनी वाढ झाली आहे. २०१०-११मध्ये १४८१ कोटींचा असलेला अर्थसंकल्प २०१३-१४मध्ये २५०८ कोटी रुपयांवर पोहोचला. अर्थसंकल्पाचे आकारमान वाढवीत असतानाच अतिरिक्त पालिका आयुक्त मनीषा म्हैसकर यांनी मुंबईच्या आरोग्याचा र्सवकष विचार करून केईएम, शीव, नायरसह प्रमुख रुग्णालयांचे अत्याधुनिकीकरण केले, तसेच या रुग्णालयांचे उपनगरीय रुग्णालयांशी लिंकेज केले. परिणामी, उपनगरीय रुग्णालयातही सुपरस्पेशालिटी सेवा काही प्रमाणात उपलब्ध होऊ लागली.
५ फेब्रुवारी रोजी सादर होणाऱ्या पालिका अर्थसंकल्पात पूर्व उपनगरातील आरोग्यावर प्रामुख्याने भर देण्यात आला असून भांडुप-नाहूर येथे साडेपाचशे खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे.
यात कॅन्सरसाठी स्वतंत्र विभाग असणार आहे. याशिवाय मुलुंड येथील एम.टी. अगरवाल रुग्णालय, विक्रोळी येथील महात्मा फुले रुग्णालय आणि गोवंडी येथील शताब्दी रुग्णालयाचे दजरेन्नतीकरण होणार आहे आणि साडेचारशे खाटा वाढविण्यात येणार आहे. यातून उपनगरातील पालिका रुग्णालयांमध्ये एक हजार खाटांची वाढ होणार आहे. त्याचप्रमाणे रे रोड येथील पालिकेचे रुग्णालयात पालिका-खासगी सहभागातून नवीन कॅन्सर रुग्णालय सुरू करण्यात येणार असून प्रसिद्ध कॅन्सरतज्ज्ञ डॉ. सुलतान प्रधान यांच्याशी संबंधित ट्रस्टला
ही जागा देण्यात येणार आहे.