मुंबई : महानिर्मिती कंपनीला होणाऱ्या कोळशाच्या पुरवठ्यात अद्याप फारशी सुधारणा झाली नसून सध्या केवळ दोन दिवस पुरेल, यापेक्षाही कमी साठा उपलब्ध आहे. वीजनिर्मिती कंपनीस कोळसा खाणी मंजूर करण्याच्या पद्धतीमुळे जादा दराने कोळसा खरेदी करावा लागत असून विजेचा दर २५-३० पैसे प्रति युनिटने वाढत आहे. त्यामुळे ही पद्धत बंद करावी, अशी भूमिका महानिर्मिती कंपनीने घेतली आहे.

गेल्या काही दिवसांपासून कोळशाचा अपुरा पुरवठा होत असून दैनंदिन ९० हजार मेट्रिक टन गरज असताना एक लाख ६० हजार मेट्रिक टन इतकाच साठा आहे. हा साठा दोन दिवसही पुरणार नाही. कोळशाच्या अपुऱ्या पुरवठ्यामुळे महानिर्मिती कंपनीने १३४० मेगावॉट क्षमतेचे पाच वीजनिर्मिती संच बंद ठेवले आहेत, तर १५८० मेगावॉटचे पाच संच देखभाल व दुरुस्तीसाठी बंद ठेवण्यात आले आहेत. सध्या १७ वीजनिर्मिती संच ६२ टक्के क्षमतेने सुरू असल्याचे कंपनीच्या उच्चपदस्थांनी सांगितले.

महानिर्मिती कंपनीला ७० टक्के कोळसा वेस्टर्न कोल्ड फील्डकडून मिळतो आणि अन्य कोळसा पुरवठा कंपन्यांपेक्षा २० टक्के दर अधिक आहे. महानिर्मिती कंपनीला अधिसूचित दर, मंजूर कोळसा खाणीचा दर आणि कॉस्ट प्लस दर, अशा तिहेरी पद्धतीने कोळसा पुरवठा होतो. अधिसूचित दरापेक्षा मंजूर खाणीतील कोळशाचा दर प्रति टन ४५० रुपयांनी तर कॉस्ट प्लसचा दर प्रति टन ८५० रुपयांनी अधिक आहे. त्यामुळे प्रति युनिट विजेचा उत्पादन खर्च २५-३० पैशांनी वाढत असून विशिष्ट खाणी मंजूर करण्याची पद्धत बंद करण्याची महानिर्मिती कंपनीची मागणी आहे.