अहमदनगर जिल्ह्य़ातील भंडारदरा व मुळा तसेच नाशिक जिल्ह्य़ातील धरणांमधून जायकवाडीला पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने सोमवारी नकार दिला. पाणी सोडण्याचा निर्णय तज्ज्ञांनी घेतला आहे. त्याला अशीच स्थगिती देणे योग्य ठरणार नाही, असे स्पष्ट करीत न्यायालयाने या प्रकरणाची सुनावणी १६ डिसेंबर रोजी ठेवली.
उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देत या संदर्भातील सर्व याचिका एकत्रित सुनावणीकरिता मुंबई उच्च न्यायालयाकडे वर्ग केल्या होत्या; परंतु ५ डिसेंबर रोजी पुन्हा एकदा जायकवाडीत सात ते आठ टीएमसी पाणी सोडण्याचा निर्णय घेण्यात आला; परंतु या धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्यात आल्यास अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्य़ातील शेतकऱ्यांवर अन्याय होईल, येथील लोकांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्नही उपस्थित होईल, असा दावा करीत पद्मश्री विखे पाटील साखर कारखाना, अशोक काळे यांच्यासह नाशिक-नगरमधील शेतकऱ्यांनी सोमवारी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत पाणी सोडण्याच्या निर्णयाला स्थगिती देण्याची मागणी केली.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती बी. पी. कुलाबावाला यांच्या खंडपीठासमोर नगर-नाशिक विरुद्ध मराठवाडा या पाण्यासंदर्भातील वादाच्या सर्व याचिकांवर सुनावणी झाली. नाशिक-नगरमधील धरणांतील पाणी जायकवाडीत सोडण्याचा निर्णय घेऊन येथील लोकांवर, शेतकऱ्यांवर अन्याय केला जात असल्याचा आरोप यावेळी याचिकाकर्त्यांनी केला.
सरकारी वकील अभिनंदन वग्यानी यांनी सर्व आरोप फेटाळत पाणी सोडण्याचा निर्णय राज्य जलस्रोत प्राधिकरणाने घेतला असल्याची बाब न्यायालयाच्या निदर्शनास आणली. शिवाय सध्या जायकवाडी धरणात नेमके किती पाणी आहे, मुळा-भंडारदरामध्ये किती पाणी आहे याबाबत नेमकी माहिती आता आपल्या हाती नाही. त्यामुळे प्रतिज्ञापत्र सादर करण्यासाठी वेळ देण्याची विनंती न्यायालयाकडे केली.

नगर जिल्ह्य़ात असंतोष
जायकवाडी धरणात पाणी सोडण्याच्या आदेशामुळे नगर जिल्ह्य़ात कमालीचा असंतोष निर्माण झाला आहे. सोमवारी श्रीरामपूर, राहुरी, नेवासे, अकोले यासह आठ ते दहा ठिकाणी आंदोलने झाली.
* मुळा धरणातून ५ हजार क्यूसेक्सने, तर भंडारदरा धरणातून ४ हजार ८११ क्यूसेक्सने पाणी नदीपात्रात सोडले जात आहे.
* भंडारदरा धरणातील पाण्याने प्रथम अकोले तालुक्यातीलच निळवंडे धरण भरून घेण्यात येणार असून नंतर ते पाणी जायकवाडीकडे झेपावेल.
* मुळा नदीतील पाणी थेट नदीपात्रात सोडण्यात येत आहे. या पाण्याने नगर जिल्ह्य़ात लाभक्षेत्रात कमालीचा असंतोष निर्माण झाला असून ठिकठिकाणी सर्वपक्षीय नेते व कार्यकर्त्यांसह शेतकरी रस्त्यावर उतरले आहेत.
* त्यांचा विरोध मोडून काढण्यासाठी पोलिसांनी सोमवारी अनेक ठिकाणी बळाचा वापर केला. जिल्ह्य़ातील महत्त्वाच्या अनेक राज्यमार्गावर सोमवारी बराच काळ रास्ता रोको आंदोलने झाली.

भंडारदरातून वेग वाढविला
गोदावरी खोऱ्याच्या ऊध्र्व भागात, म्हणजे नगर जिल्ह्य़ातून पाणी सोडताना खळखळ झाली खरी; पण गोदावरी पाटबंधारे महामंडळाचे अधिकारी जायकवाडीला पाणी देण्याच्या निर्णयावर ठाम राहिले आणि सोमवारी दुपारी त्यांनी अंमलबजावणीला वेग दिला. तसा पाण्याचा वेगही वाढला. मुळा धरणातूनही दुपारी २ हजार क्यूसेक्स वेगाने पाणी सोडण्यात आले. दरम्यान, शनिवारी भंडारदरातून सोडण्यात आलेल्या पाण्याचा वेग ४ हजार ८१६ क्यूसेक्सपर्यंत वाढवण्यात आला. आज, मंगळवारी तो ६ हजार क्यूसेक्सहून अधिक होईल. त्यामुळे जायकवाडीकडे झेपावलेले पाणी लवकरच पोहोचेल, असा अंदाज आहे.