येत्या दोन दिवसांत मुंबईतील ८ डान्सबारना तातडीने परवाने देण्यात यावेत, असे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिले आहेत. त्यामुळे गेल्या काही दिवसांपासून कडक अटी घालून डान्सबारवर निर्बंध लादू पाहणाऱ्या राज्य सरकारला तातडीने परवाने द्यावेच लागणार आहेत. या प्रकरणी सर्वोच्च न्यायालयात पुढील सुनावणी शुक्रवारी होणार आहे.
डान्स बारला परवानगी देताना ते सुरूच राहू नयेत, अशा प्रकारे कठोर निर्बंध लादण्याची तरतूद असलेले विधेयक विधीमंडळाच्या दोन्ही सभागृहात एकमताने मंजूर करण्यात आले आहे. राज्य सरकारने सुरुवातीला २६ अटी आणि त्यानंतर नवा कायदा आणल्यामुळे राज्यात डान्सबार सुरू होणे कठीण असल्याचेच दिसून येत होते. त्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आलेल्या याचिकेवरील सुनावणीवेळी न्यायालयाने दोन दिवसांत ८ डान्सबारना आवश्यक परवाने देण्याचे निर्देश दिले आहेत.