मुंबई : राज्यातील सत्तासंघर्ष आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमधील आरक्षणाच्या मुद्द्याबाबतच्या याचिकांवरील सुनावणी सर्वोच्च न्यायालयाने बुधवारी पुन्हा पुढे ढकलली. सुनावणीच्या नवीन तारखा न्यायालयाकडून जाहीर केल्या जातील. सुनावणी लांबणीवर गेल्याबद्दल शिवसेना ठाकरे गटाचे खासदार अरविंद सावंत यांनी तीव्र नापसंती व्यक्त करीत पक्षांतरबंदीसाठी असलेले दहावे परिशिष्ट रद्द करावे, अशी मागणी केली आहे.

सरन्यायाधीश सूर्य कांत, न्यायमूर्ती जॉयमाल्या बागची आणि न्यायमूर्ती विपुल पंचोली यांच्या त्रिसदस्यीय पीठापुढे याबाबतच्या अनेक याचिका सुनावणीसाठी ठेवण्यात आल्या होत्या. पण अन्य कामकाज व याचिकांवरील सुनावण्यांमुळे न्यायालयाने सत्तासंघर्ष आणि निवडणुकांमधील आरक्षणाच्या मुद्द्यावरील याचिकांची सुनावणी बुधवारी होवू शकली नाही. नव्याने तारखा दिल्या जातील.

सत्तासंघर्षाबाबतच्या याचिकांवर गेल्या ३-४ वर्षांत निकाल प्रलंबित ठेवल्याने शिवसेना (उद्धव ठाकरे) खासदार अरविंद सावंत यांनी संतप्त होत टीका केली आहे. ‘ तुम्ही खुर्चीवर कशासाठी बसता, असा सवाल करीत येथे आमची मनमानी चालते, आमच्या मनात येईल, ते संविधान ’, असे सर्वोच्च न्यायालयाने एकदा सांगून टाकावे, अशी खळबळजनक टिप्पणी सावंत यांनी केली.

शिवसेनेत फूट पडल्यानंतर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील पक्षाला मूळ पक्ष म्हणून मान्यता आणि धनुष्यबाण निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय केंद्रीय निवडणूक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या पक्षालाही मूळ पक्ष म्हणून मान्यता आणि घड्याळ हे निवडणूक चिन्ह देण्याचा निर्णय हा निवडणूक आयोग व विधानसभा अध्यक्षांनी घेतला आहे. त्याला आव्हान देणाऱ्या याचिका ठाकरे आणि शरद पवार यांच्या गटातर्फे सादर करण्यात आल्या आहेत.

हा लोकशाहीचा खेळ चालला आहे का ?

सत्तासंघर्षाच्या याचिकांवरील सुनावणी पुन्हा पुढे ढकलली गेल्याने संतप्त झालेले खासदार सावंत म्हणाले, सर्वोच्च न्यायालय हे न्याय देण्यासाठी आहे की न्याय प्रलंबिथ ठेवण्यासाठी ? हा लोकशाहीचा खेळ चालला आहे का? या याचिका सादर झाल्यानंतर एन.व्ही. रामण्णा, उदय लळित, डॉ. धनंजय चंद्रचूड, शरद बोबडे, भूषण गवई हे सरन्यायाधीश होवून गेले. पण याचिकांवर तारखाच पडत आहेत. इतके बेशिस्त वर्तन होवूनही आम्हाला न्याय मिळत नाही. युक्तिवादासाठी किती वेळ लागेल, याबाबत खंडपीठाने दोन्ही बाजूच्या वकिलांना विचारणा केली होती. तेव्हा दोघांना मिळून तीन तास पुरतील, असे सांगितल्यावर आज साडेअकरा वाजता सुनावणी निश्चित करण्यात आली होती. पण कार्यक्रम पत्रिकेवर आमच्या याचिका ३७ व्या क्रमांकावर दाखविण्यात आल्या.

बिहारमधील निवडणुका होवून गेल्यावर तेथील मतदारयाद्यांबाबतची सुनावणी आता होत आहे. आमच्या याचिकांवर सुनावणी प्रलंबित राहिली आणि निवडणुका व पक्षचिन्हाचा वापर शिंदे यांनी केला. याचिकांवरील सुनावणी खंडपीठाने आज ठेवली असताना ती का होत नाही ? आमच्या वकिलांनी सुनावणीची नवीन तारीख विचारल्यावर न्यायमूर्ती उठून निघून गेले, असे सावंत यांनी सांगितले.