मुंबई : आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांतर्गत सध्या अटकेत असलेले माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्या जामीन अर्जावरील निर्णय उच्च न्यायालयाने बुधवारी राखून ठेवला. सर्वोच्च न्यायालयाने फटकारल्यानंतर दोन दिवसांत सुनावणी पूर्ण करून उच्च न्यायालयाच्या एकलपीठाने याचिकेवरील निर्णय राखून ठेवला. मात्र त्याच वेळी याचिका सादर न करता थेट सर्वोच्च न्यायालयात गेल्यावरूनही न्यायालयाने नाराजी व्यक्त केली. 

देशमुख यांच्या जामीन याचिकेवरील सुनावणीला विलंब केल्यावरून सर्वोच्च न्यायालयाने सोमवारी उच्च न्यायालयाला फटकारले होते. तसेच याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्याचे आदेश दिले होते. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती निजामुद्दीन जमादार यांच्या एकलपीठासमोर देशमुख यांच्या जामीन याचिकेवर मंगळवारी सुनावणी सुरू झाली व देशमुख यांच्या वकिलांनी त्यांचा युक्तिवादही पूर्ण केला.  याप्रकरणी बुधवारी ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंह यांनी युक्तिवाद करताना देशमुख यांना जामीन देण्यास विरोध केला.