मुंबई : मेट्रो-३ प्रकल्पाच्या कारशेडसाठी आरे दुग्ध वसाहतीतील वृक्ष तोडण्याविरोधात पर्यावरणप्रेमींनी केलेल्या याचिकेवर आता सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती उदय लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर शुक्रवारी सुनावणी होणार आहे. यापूर्वी न्यायमूर्ती धनंजय चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर या प्रकरणी सुनावणी होणार होती.

नियमानुसार, सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांनी गुरुवारी केंद्र सरकारला पत्रव्यवहार करून भावी सरन्यायाधीश म्हणून ज्येष्ठता क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर असलेल्या न्यायमूर्ती लळित यांच्या नावाची शिफारस केली. त्यामुळे न्यायमूर्ती लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर सुनावणी होणार आहे.

राज्यात सत्तांतर झाल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ िशदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारने मेट्रो-३ प्रकल्पाची कारशेड कांजूरमार्ग येथून पुन्हा आरे वसाहतीत हलवण्यात येत असल्याचे जाहीर केले होते. त्यानंतर कारशेडचे कामही सुरू झाले होते. वृक्षतोडीलाही सुरुवात करण्यात आली. या निर्णयाच्या विरोधात पर्यावरणप्रेमींनी आरेत आंदोलनही केले. तसेच प्रकल्पासाठी केल्या जाणाऱ्या आरेतील वृक्षतोडीबाबत परिस्थिती ‘जैसे थे’ ठेवण्याचे आदेश सर्वोच्च न्यायालयाने यापूर्वी दिलेले असतानाही वृक्षतोड करण्यात आली, असा दावा करून पर्यावरणप्रेमींनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. त्यांच्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती चंद्रचूड यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर शुक्रवारी होणार होती. मात्र आता ती न्यायमूर्ती लळित यांच्या अध्यक्षतेखालील खंडपीठासमोर होणार आहे.