मुंबई : मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) मुंबई महानगर प्रदेशात ३३७ किमी लांबीचे मेट्रोचे जाळे विणत असून या प्रकल्पांसाठी निधी उभारणीकरिता आता प्राधिकरणाकडून विविध पर्याय शोधले जात आहेत. या पार्श्वभूमीवर मेट्रो प्रकल्पातील कारशेडच्या जागेचा स्वत: विकास करण्याचा वा या जागेवरील चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) विक्री करण्याचा निर्णय प्राधिकरणाने घेतला आहे. त्यामुळे आता कारशेडच्या जागेवर व्यावसायिक आणि निवासी इमारती उभ्या राहणार आहेत.
याबाबतच्या प्रस्तावाला प्राधिकरणाच्या १६० व्या बैठकीत मान्यता देण्यात आली असून त्याची व्यवहार्यता तपासणी आणि सविस्तर आराखडा तयार करण्यासाठी लवकरच सल्लागाराची नियुक्ती करण्यात येणार आहे. मेट्रो संचलनासाठी कारशेड अत्यंत महत्त्वाची असते. त्यामुळे प्रत्येक मेट्रो प्रकल्पात कारशेडची उभारणी केली जात आहे. सध्या चारकोप आणि मंडाले कारशेड तयार असून लवकरच कशेळी, निळजे, मोघरपाडा, कांजूरमार्ग येथे कारशेड उभारली जाणार आहेत. प्राधिकरणाला या कारशेडसाठी
सरकारी जागा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. मात्र विविध मेट्रो प्रकल्पांसाठी निधीची पूर्तता करण्याचे प्राधिकरणासमोर आव्हान आहे. कर्जाद्वारे मेट्रोसाठी निधी उभारला जात असला तरी भविष्यात तिकीट विक्रीद्वारे कर्ज परतफेड करणे शक्य होणार नाही. त्यामुळे उत्पन्नाचे स्रोत कसे वाढविता येतील या दृष्टीने विचार सुरू आहे. त्यातूनच एमएमआरडीएने नुकतीच राज्य सरकारकडे मुंबई महानगर प्रदेशातील मोकळ्या सरकारी जमिनींची मागणी केली आहे. या जमिनींच्या विकासातून प्रकल्प निधी उभारणीचा एमएमआरडीएचा प्रयत्न आहे. आता कारशेडच्या जागेचा व्यावसायिक वापर करून, त्यावरील चटई क्षेत्र निर्देशांकाची (एफएसआय) विक्री करून महसूल मिळविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
चारकोप, मंडाले, कांजूरमार्गमधील जागेबाबत पाठपुरावा
बेलापूरमध्ये सिडकोच्या माध्यमातून बस आगारामध्ये ७० मजली निवासी इमारत उभारण्यात आली आहे, त्याच धर्तीवर कारशेडच्या जागेत इमारती बांधण्याचा एमएमआरडीएचा विचार आहे. याबाबतच्या प्रस्तावाला सोमवारी प्राधिकरण बैठकीत मंजुरी देण्यात आल्याची माहिती महानगर आयुक्त डॉ. संजय मुखर्जी यांनी ‘लोकसत्ता’ला दिली. चारकोपसह अन्य काही कारशेडचा व्यावसायिक वापर करण्यासाठी रेल्वेची परवानगी घ्यावी लागणार आहे. त्याबाबतही लवकरच कार्यवाही केली जाणार आहे. त्यामुळे भविष्यात चारकोप, मंडाले, कांजूरमार्ग आणि अन्य कारशेडच्या जागेवर मोठमोठ्या इमारती उभ्या राहणार आहेत.

