मुंबई : सुप्रिया सुळे यांची राज्याच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आल्याने पक्षांतर्गत कारभारात त्यांचे महत्त्व वाढले आहे. पक्षात आता अजित पवार आणि सुप्रिया सुळे यांना मानणाऱ्या नेतेमंडळींमध्ये उघडपणे दरी निर्माण होण्याची शक्यता वर्तविली जाते. अजितदादांच्या विरोधातील गटाचे नेतृत्व आपसूकच सुप्रिया सुळे यांच्याकडे होते. उघडपणे ही दरी दिसत नसली तरी पक्षांतर्गत कारभारात त्याचे प्रतिबिंब उमटत होते. पक्षात दिग्गज नेत्यांची फळी असताना तुलनेत कमी अनुभव असलेल्या सुप्रिया सुळे यांच्या सल्ल्याने राज्याचा पक्षांतर्गत कारभार होणार आहे. सुप्रिया यांच्याकडे महाराष्ट्राचे प्रभारीपद सोपवून पवारांनी आपला राजकीय उत्तराधिकारी कोण असेल यावर शिक्कामोर्तब केले. यापुढे सर्व नेत्यांना सुप्रिया सुळे यांच्याशी सल्लामसलत करावी लागेल हे अधोरेखित केले.