scorecardresearch

“तुमच्या घरावर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र सरकार कमी पडलं असं वाटत नाही का?” सुप्रिया सुळे म्हणाल्या…

घरावर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र सरकार कमी पडलं असं वाटत नाही का? या प्रश्नाला सुप्रिया सुळे यांनी थेट उत्तर दिलं.

राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या घरावर आक्रमक एसटी कर्मचाऱ्यांच्या जमावाने हल्ला केला. त्यावेळी तो हल्ला रोखण्यात राज्यातील महाविकास आघाडी सरकार कमी पडल्याचाही आरोप झाला. आता याच आरोपाबाबत राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना थेट प्रश्न विचारण्यात आला. त्याला सुप्रिया सुळे यांनीही थेट उत्तर दिलं. त्यावेळी राज्य सरकार कमी पडलं किंवा अपयशी ठरलं असं मी म्हणणार नाही, असं मत सुप्रिया सुळे यांनी व्यक्त केलं. सुप्रिया सुळे लोकसत्ताच्या ‘दृष्टी आणि कोन’ या कार्यक्रमात लोकसत्ताचे संपादक गिरीश कुबेर यांनी घेतलेल्या मुलाखतीत बोलत होत्या.

सुप्रिया सुळे म्हणाल्या, “मी त्याला हल्ला म्हणणार नाही, मी त्याला घटना म्हणेल. तिथं जे लोक आले होते ते आपल्या राज्यातील लोक होते. त्यांच्या मनात राग होता, तो कोणीतरी भरला असेल, मात्र ते आले होते कारण त्यांना वाटत होतं की त्यांचा प्रश्न सुटेल. आज राज्यात जे सरकार आहे त्याचे आम्ही अविभाज्य घटक आहोत. त्यामुळे त्यांचं म्हणणं ऐकून घेणं आमची जबाबदारी आहे.”

“निकालानंतर ९,००० कर्मचारी गुलाल खेळून परत गेले, मग १०० लोक मागे का राहिले?”

“मुंबई उच्च न्यायालयाच्या निकालानंतर आदल्या दिवशी गुलाल खेळला गेला. आदल्या दिवशी ९,००० लोक गुलाल खेळून परत गेले होते, मग १०० लोक मागे का राहिले होते? त्याचा तपास पोलीस करतील. मात्र, जे लोक आले त्यांची मतं जाणून घेणं आम्हाला महत्त्वाचं वाटतं. ती आमची जबाबदारी वाटते,” असं सुप्रिया सुळे यांनी सांगितलं.

“सरकारला अपयश आलं असं मी म्हणणार नाही”

सुप्रिया सुळे पुढे म्हणाल्या, “आमच्या घरावर हल्ला झाला तेव्हा महाराष्ट्र सरकार कमी पडलं किंवा सरकारला अपयश आलं असं मी म्हणणार नाही. एखादा चुकीचा नेता मिळाला, तर संस्थेचं काय होतं याचं उदाहरण एसटी महामंडळ आहे. सरकार त्यांच्याशी बोलत होतं. मात्र, एक व्यक्ती त्यांच्याशी बोलत होता. त्यांच्याकडून ३०० रुपये प्रत्येकी गोळा करत होता. त्या व्यक्तीच्या घरी नवी गाडी येते आणि एसटी कामगारांचं काय?”

हेही वाचा : “मला हनुमान चालिसा म्हणता येत नाही हे मी प्रांजळपणे कबुल करते, मात्र…”, सुप्रिया सुळेंचं वक्तव्य

“एसटी कामगारांच्या १२१ आत्महत्यांचा आकडा कोठून आला?”

“आंदोलनातील महिला आणि एकूणच कामगार आंदोलना दरम्यान १२१ आत्महत्या झाल्या असं सांगत होत्या. एक आत्महत्या झाली तरी ते वाईटच आहे. मात्र, १२१ हा आकडा मोठा आहे, तो आकडा कोठून आला? तसं झालं असेल तर त्यावर उपाययोजनाही करायला हव्यात. नेता म्हणून एखाद्या व्यक्तिला केवळ शिव्या घालणं याला नेतृत्व म्हणत नाही. तुम्ही चर्चा करून कामगारांच्या आयुष्यात चांगल्या गोष्टी आणल्या पाहिजे,” असंही सुप्रिया सुळे यांनी नमूद केलं.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.

Web Title: Supriya sule comment on attack by st employee protesters and mva government pbs

ताज्या बातम्या