मुंबई : लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत केंद्र सरकारकडून नव्या विधेयकाचा मसुदा मिळाल्यानंतर इंडिया आघाडी चर्चा करून पाठिंबा द्यायचा की, नाही, याचा निर्णय घेईल. हा निर्णय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष म्हणून नव्हे, तर इंडिया आघाडी म्हणून एकत्रितपणे घेतला जाईल. लोकसंख्येच्या आधारे नाही, तर सर्वच राज्यांत सरसकट जागांमध्ये ५० टक्के वाढ आणि मतदारसंघांचे विभाजन करण्याचे प्रारुप पाहूनच अंतिम निर्णय घेऊ, अशी स्पष्ट भूमिका राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) पक्षाच्या कार्याध्यक्षा, खासदार सुप्रिया सुळे यांनी बुधवारी मांडली.
यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. लोकसभा मतदारसंघांच्या फेररचनेबाबत पक्षाने अद्याप अधिकृतपणे कोणतीही भूमिका घेतलेली नाही. महिला आरक्षण विधेयक या पूर्वीच अर्थसंकल्पीय अधिवेशनात एकमताने मंजूर झालेले आहे, तो विषय आता संपला असून, लोकसभा मतदारसंघांची फेररचना हा महत्त्वाचा विषय आहे, असेही सुळे म्हणाल्या.
लोकसभा मतदारसंघांच्या फेररचना विधेयकाला आम्ही यापूर्वी विरोध केला आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार), शिवसेना (ठाकरे) आणि एमआयएमच्या नेत्यांची बैठक झाली होती. शहा यांनी सरसकट सर्व राज्यांत लोकसभेच्या विद्यमान जागांमध्ये ५० टक्के वाढ केली जाईल, असे सांगितले. त्या बाबत इंडिया आघाडीत चर्चा झाली. इंडिया आघाडीला एकत्र चर्चेला बोलवा. आम्ही पाठिंबा देऊ, असेही आमच्याकडून सांगितले गेले. पण, मतदारसंघांचे विभाजन करण्याचे प्रारुप काय असेल, या बाबतची माहिती आम्हाला दिली नाही, असेही सुळे म्हणाल्या.
प्रत्यक्ष लोकसभेत सादर करण्यात आलेल्या विधेयकात ५० टक्के जागा वाढीचा उल्लेख नव्हता. विरोधानंतर स्वतः अमित शहा यांनी एक तास सभागृह तहकूब करून ५० टक्के जागा वाढीसह विधेयक पुन्हा मांडू, असे जाहीर केले. पण, प्रत्यक्षात असे काहीच झाले नाही. त्यामुळे आता केंद्र सरकारकडून नव्या मतदारसंघ फेररचना विधेयकाचा मसुदा आमच्याकडे आल्यानंतर विधेयकाचा अभ्यास करून भूमिका ठरवू. ५० टक्के जागा वाढ आणि मतदारसंघाच्या विभाजनाचे प्रारुप, या दोन महत्त्वाच्या अटी असतील, असेही सुळे म्हणाल्या.
पक्षाचे ज्येष्ठ नेते जयंत पाटील आणि मुख्यमंत्री फडणवीस यांची मंगळवारी रात्री झालेली भेट पूर्व नियोजित होती. ईश्वरपूरच्या लोकनियुक्त नगराध्यक्षांचे पद चुकीच्या पद्धतीने रद्द करण्यात आले आहे. त्या बाबत चर्चा करण्यासाठी पाटील यांनी फडणवीस यांची भेट घेतली, त्यात काहीच गोपनीय नव्हते. जयंत पाटील यांची फडणवीस यांच्या सोबत भेट झाली, तेव्हा सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल तिथे उपस्थितीत होत किंवा नाही, हे फडणवीस यांनीच जाहीर करावे, असेही सुळे म्हणाल्या.
राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाला काँग्रेस, भाजप, शिवसेनेत विलिन करून झाले आहे. आता फक्त मनसेत विलिनकरण करण्याचे राहिले आहे. आमच्यावर आता ईडी, सीबीआय कारवाई करू शकत नाही, म्हणून आमची बदनामी सुरू झाली आहे, असा आरोपही सुळे यांनी माध्यमांवर केला. जयंत पाटील – मुख्यमंत्री फडणवीस पूर्वनियोजित
