पक्ष पाठिशी असल्याचा संदेश
गैरव्यवहारप्रकरणी सध्या तुरुंगाची हवा खात असलेले माजी उपमुख्यमंत्री छगन भुजबळ यांची राष्ट्रवादीचे पक्षाध्यक्ष शरद पवार यांची कन्या खासदार सुप्रिया सुळे यांनी आर्थर रोड तुरुंगात जाऊन भेट घेतली. पवारकन्या भुजबळांच्या भेटीला गेल्याने पक्षाने भुजबळांना वाऱ्यावर सोडलेले नाही हा संदेश राष्ट्रवादीने दिला आहे.
छगन भुजबळ यांच्याविरुद्ध सूडबुद्धीने कारवाई झाल्याचा आरोप शरद पवार यांनी केला होता. पण पवार यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी किंवा वित्तमंत्री अरुण जेटली यांच्याशी उत्तम संबंध असूनही पवारांनी भुजबळांची अटक टाळण्यास मदत केली नाही, अशी चर्चा सुरू झाली. विशेषत: भुजबळ समर्थक संतप्त झाले होते. अजित पवार हेसुद्धा चौकशीच्या फेऱ्यात असून, त्यांना वाचविण्याकरिता पक्ष पुढाकार घेईल, असे बोलले जाऊ लागले. अटकेनंतर भुजबळ एकाकी पडल्याची चर्चा सुरू झाली होती. या पाश्र्वभूमीवर सुप्रिया सुळे यांनी कारागृहात जाऊन भुजबळांची भेट घेतल्याने त्याला वेगळे महत्त्व प्राप्त झाले.
पवारकन्याच भुजबळांच्या भेटीला गेल्याने राष्ट्रवादी भुजबळांच्या पाठीशी असल्याचा संदेश गेला आहे.