व्यावसायिक अपयशातून आलेल्या नैराश्येतून नव्हे तर फसलेल्या प्रेम प्रकरणामुळेच जिया खानने आत्महत्या केली, असा आरोप कुटुंबीयांनी केला असून या प्रकरणी जुहू पोलीस तपास करीत नसल्याबद्दल नाराजी व्यक्त केली आहे. जियाने इंग्रजीत लिहिलेल्या सहापानी पत्राने यावर प्रकाश पडत असून त्यामुळे तिचा प्रियकर सूरज पंचोली अडचणीत येण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
जियाच्या शयनगृहात सापडलेले हे पत्र कुटुंबीयांकडून जुहू पोलिसांना सुपूर्द केले जाणार आहे. जुहू पोलिसांच्या कारवाईवर विश्वास नसल्याने या पत्राची मूळ प्रत आपल्याकडेच ठेवण्याचे कुटुंबीयांनी ठरविले आहे. पोलिसांना तपासासाठी नोटरी केलेली प्रत देण्याची तयारी त्यांनी दाखविली आहे. हे पत्र जुहू पोलीस ठाण्यापर्यंत पोहोचलेले नाही. मात्र या पत्रात दोघांमधील ताणल्या गेलेल्या संबंधांचा प्रामुख्याने उल्लेख असल्याचे सूत्रांनी सांगितले.
जुहू पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक अरुण भगत तसेच तपास अधिकारी गाडेकर हे याबाबत काहीही सांगण्यास तयार नाहीत. मात्र याबाबत कायदेशीर मत घेऊनच कारवाई केली जाईल, असा पवित्रा जुहू पोलिसांनी घेतला आहे. या पत्रात सूरजचे नाव आहे का, याबाबतही काहीही सांगण्यास पोलिसांनी नकार दिला आहे.
हे पत्र जियानेच लिहिले आहे का, याची चौकशी करण्यासाठी पोलिसांकडून हस्ताक्षरतज्ज्ञांची मदत घेतली जाणार आहे. हे पत्र जियानेच लिहून ठेवले होते, असे कुटुंबीयांचे म्हणणे आहे. जियाला दोन चित्रपटात काम मिळाले होते. ती खूप खुश होती. ही खबर आईला देऊन तिला आश्चर्याचा धक्का द्यायचा होता, असे जियाची बहिण कविता हिचे म्हणणे आहे. जियाला अजिबात व्यावसायिक नैराश्य नव्हते. उलटपक्षी सूरज हा तिच्यासाठी योग्य नव्हता. त्यांच्यातील संबंध ताणले गेले होते. त्यादिवशी नेमके काय घडले, याचा पोलिसांनी अजिबात तपास केलेला नाही, असेही कुटुंबीयांचे मत आहे.

पत्रातला मजकूर..
‘तू मला फसवले आहेस. मी तुझ्यावर विश्वास टाकला. आपल्यातील संबंधांची तू अजिबात पर्वा केली नाहीस. माझ्याशी बेपर्वाई केलीस. ज्यावेळी तू हे पत्र वाचत असशील तेव्हा खूप उशिर झालेला असेल, मी या जगात नसेन.’