scorecardresearch

सूरज पांचोलीचा जियावर शारीरिक-शाब्दिक अत्याचार; न्यायालयात दावा

अभिनेता सूरज पांचोली आपल्या मुलीवर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार करायचा, असा दावा अभिनेत्री जिया खानच्या आईने बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात साक्ष देताना केला.

सूरज पांचोलीचा जियावर शारीरिक-शाब्दिक अत्याचार; न्यायालयात दावा
अभिनेता सूरज पांचोली व जिया खान

मुंबई : अभिनेता सूरज पांचोली आपल्या मुलीवर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार करायचा, असा दावा अभिनेत्री जिया खानच्या आईने बुधवारी विशेष सीबीआय न्यायालयात साक्ष देताना केला. जियाने २०१३ मध्ये आत्महत्या केली होती. जियाला आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा सूरजवर आरोप आहे.

सूरज सध्या जामिनावर बाहेर आहे. तो जियासोबत नातेसंबंधात होता. मात्र त्यांच्यातील वादानंतर जियाने आत्महत्या केली होती, असा आरोप त्याच्यावर आहे. बुधवारी जियाची आई राबिया खान यांची विशेष सीबीआय न्यायालयाचे न्यायाधीश ए. एस. सय्यद यांच्यासमोर साक्ष नोंदवण्यात आली. त्यावेळी राबिया यांनी सूरज जियावर शारीरिक आणि शाब्दिक अत्याचार करत असल्याचा दावा केला.

या वेळी राबिया यांनी जियाचा बॉलीवूडमधील प्रवेश, तिची कारकीर्द आणि सूरजसोबतचे नाते याबद्दल न्यायालयाला सांगितले. सूरजने समाजमाध्यमातून जियाशी संपर्क साधला होता आणि तिला भेटण्याचा आग्रह धरला होता.

ऑक्टोबर २०१२ पासून दोघेही एकत्र राहत होते, असा दावाही राबिया यांनी केला. त्याच वर्षी २०१२ मध्ये जिया आपल्याला भेटायला लंडनला आली होती आणि खूप आनंदी होती. त्यानंतर ती मुंबईला परतली. काही दिवसांनी सूरजने आपल्याला एक संदेश पाठवला होता. त्यात त्याने जिया त्याच्यावर नाराज असल्याचे आणि तिला आपल्याला एक संधी देण्यास सांगण्याचे म्हटले होते. जियाने त्याला दुसरी संधी दिली होती, असा दावा राबिया यांनी केला.

मराठीतील सर्व मुंबई ( Mumbai ) बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.