रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना सूचना

वारंवार रेल्वे सेवा विस्कळीत होण्याच्या प्रकारांना आळा घालण्यासाठी मध्य, पश्चिम आणि हार्बर या तिन्ही मार्गावर आवश्यक त्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसविणे, रेल्वेच्या मालमत्तेचे संरक्षण आणि रेल्वे गाडय़ांचे वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे आदी सूचना रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना गुरुवारी दिल्या.

गेल्या काही दिवसांमध्ये रेल्वेसेवा विस्कळीत होण्याच्या प्रकारांमध्ये वाढ झाली असून त्याची गंभीर दखल घेऊन सुरेश प्रभू यांनी रेल्वेच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची तातडीची बैठक आयोजित केली होती. गेल्या सोमवारी आणि मंगळवारी पश्चिम आणि मध्य रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली होती. त्यामुळे मुंबईकरांना त्रास सहन करावा लागला होता. या घटनेबाबत बैठकीत चर्चा करण्यात आली. रेल्वेने आपले वेळापत्रक काटेकोरपणे पाळणे आवश्यक असल्याचे प्रभू यांनी स्पष्ट केले. रेल्वेच्या मालमत्तांचे संरक्षण करण्यासाठी ठोस उपाययोजना करण्याची सूचनाही त्यांनी या वेळी केली. गेल्या सोमवारी माहीम उपकेंद्रातील १८ बॅटरी चोरीला गेल्यामुळे रेल्वे सेवा विस्कळीत झाली होती. पुन्हा असा प्रकार घडू नये म्हणून रेल्वे सुरक्षा बलाने सुरक्षा व्यवस्था अधिक कडक करावी. महत्त्वाच्या ठिकाणी सीसी टीव्ही कॅमेरे बसवावेत, असे आदेशही सुरेश प्रभू यांनी दिले.