शिवसेनेच्या (ठाकरे गट) उपनेत्या सुषमा अंधारे यांनी शिवसेनेचे (शिंदे गट) आमदार संजय शिरसाट यांच्यावर हल्लाबोल केला आहे. संजय शिरसाट यांनी अश्लील वक्तव्य प्रकरणात पोलिसांनी क्लीनचिट दिल्याचं वक्तव्य केलं. यानंतर सुषमा अंधारे यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा उल्लेख करत त्याला प्रत्युत्तर दिलं.
सुषमा अंधारे म्हणाल्या, “छत्रपती संभाजीनगरच्या एका आमदाराने असभ्य आणि सवंग भाषेचा वापर केला. ती भाषा स्त्री मनाला लज्जा आणणारी होती. त्या भाषेचे अनेक व्हिडीओ सार्वजनिक आहेत. एकीकडे शितल म्हात्रे प्रकरणात ओरिजनल व्हिडीओ दाखवता येत नाही तरीही गुन्हे दाखल केले जातात. दुसरीकडे आम्ही ओरिजनल व्हिडीओ दाखवूनही गुन्हे दाखल होत नाहीत.”




“आम्ही कलम १५६ नुसार न्यायालयाकडे दाद मागितली”
“यानंतर आम्ही महिला आयोगाकडे धाव घेतली. पोलीस स्टेशनमध्ये धाव घेतली. पोलीस स्टेशनने दाद न दिल्याने, त्याबाबत गुन्हा दाखल न केल्याने आम्ही कलम १५६ नुसार न्यायालयाकडे दाद मागितली. यानंतर सरकारने अशा भाषेचा वापर झाला असेल तर आम्ही त्याची एसआयटीमार्फत चौकशी करू अशी घोषणा केली.”
“अतिशय असभ्य आणि उर्मट आमदाराने पोलिसांनी त्याला…”
सुषमा अंधारे पुढे म्हणाल्या, “देवेंद्र फडणवीस गृहमंत्री आहेत. त्यांच्या खात्याकडूनच चौकशी समिती नेमली गेली. त्यामुळे त्यांना त्याविषयी जास्त माहिती असेल. संभाजीनगरच्या बोलण्यात अतिशय असभ्य आणि उर्मट आमदाराने पोलिसांनी त्याला क्लीनचिट दिल्याचा दावा केला. ही क्लीनचिट कशी दिली ते मला कळेल का? वकील म्हणून देवेंद्र फडणवीस मला मार्गदर्शन करतील का?”
“मला वकील फडणवीसांना सांगावं की एखाद्या प्रकरणात…”
“एखाद्या प्रकरणात एसआयटी नेमली असेल, एखाद्या प्रकरणात चौकशीसाठी पोलीस अधिकाऱ्यांची नेमणूक झाली असेल, तर पोलीस अधिकारी एकांगी चौकशी करतात का? या प्रकरणात आरोपी आणि तक्रारदार दोघांचंही म्हणणं ऐकावं लागेल. कोणत्या अधिकाऱ्याला नेमलं, नेमलेला अधिकारी महिला होती की पुरुष हेच मला माहिती नाही. त्या अधिकाऱ्यांचा प्रशासकीय वर्ग काय होता हेही मला माहिती नाही. ते माहिती करून घेण्याचा अधिकार मला आहे की नाही हे मला वकील फडणवीसांना सांगावं,” असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
“वकील फडणवीस कदाचित तथ्य समोर ठेवतील”
“कारण गृहमंत्री फडणवीस सत्तेच्या बाजूने बोलतील, पण वकील फडणवीस कदाचित तथ्य समोर ठेवतील. त्यामुळे वकील फडणवीसांनी मला जरा माहिती सांगावी,” असं म्हणत अंधारेंनी फडणवीसांना लक्ष्य केलं.