मुंबई : मिसिंग लिंक प्रकल्पावरील चर्चेदरम्यान विधानसभेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वापरलेल्या भाषेवरून ठाकरे गटाच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. खुले पत्र लिहित अंधारे यांनी, “सभागृहात विरोधकांना आणि प्रश्न विचारणाऱ्या जनतेला ‘कुत्ते’ आणि ‘भाडे के टट्टू’ म्हणत आपण महाराष्ट्राचाच अपमान केला,” असा गंभीर आरोप केला.
सुषमा अंधारे यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहित उपरोधिक सल्ला दिला आहे. राज्यातील कायदा-सुव्यवस्था, पेपरफुटी, महिला सुरक्षा, भर पावसात आंदोलन करणारे विद्यार्थी आणि कर्मचारी अशा ज्वलंत प्रश्नांवर मुख्यमंत्री भाष्य करतील, अशी अपेक्षा होती. मात्र त्यांनी संपूर्ण भाषण मिसिंग लिंक प्रकल्पावर केंद्रित ठेवत विरोधकांवर वैयक्तिक टीका केल्याचा आरोप त्यांनी केला.
मिसिंग लिंक प्रकल्पासाठी तब्बल ७,१२० कोटी रुपये जनतेच्या कराच्या पैशातून खर्च झाले असून, त्या प्रकल्पातील त्रुटींवर नागरिकांनी प्रश्न विचारणे हा त्यांचा लोकशाहीतील अधिकार असल्याचे अंधारे यांनी स्पष्ट केले. “प्रकल्पाचे श्रेय घ्यायचे, पण त्यातील दोषांची जबाबदारी स्वीकारायची नाही, ही भूमिका योग्य नाही,” असा टोला त्यांनी लगावला.
फडणवीस यांनी २०२२ मध्ये विरोधी पक्षनेते असताना केलेल्या “तुम्ही म्हणजे महाराष्ट्र नाही” या विधानाची आठवण करून देत, “आज तोच नियम तुम्हाला लागू होत नाही का?” असा सवालही अंधारे यांनी उपस्थित केला.
पत्रात त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची घटना, पेपरफुटी, महिला सुरक्षेचे प्रश्न, ड्रग्ज प्रकरणे, औद्योगिक प्रकल्प राज्याबाहेर जाणे, मराठी माणसांचे प्रश्न, तसेच विधानमंडळातील वादग्रस्त घटनांचा उल्लेख करत, “हे खरे महाराष्ट्राचा अपमान करणारे प्रसंग आहेत. त्यावेळी सरकार मौन बाळगते; मात्र प्रश्न विचारले की महाराष्ट्राच्या नावामागे लपण्याचा प्रयत्न केला जातो,” अशी टीका केली.
अंधारे यांनी मुख्यमंत्री फडणवीस यांच्यावर टीका सहन न होण्याचा आरोप करत, “सभागृहात विरोधी पक्ष, विरोधी मत आणि टीका नको अशी मानसिकता लोकशाहीसाठी धोकादायक आहे,” असे म्हटले. शेवटी त्यांनी, “आज सभागृहात आपण महाराष्ट्राचा अपमान केला आहे; हे एकांतात आरशासमोर उभे राहिल्यावर तुमचे अंतर्मनही मान्य करेल,” अशा शब्दांत मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला.
